कुडपकर यांच्या चौथ्या पिढीचा श्रीगणेशा

देवाच्या भक्तीला किंवा सेवेला ना काळ, ना वेळ त्याचप्रमाणे ना जात, ना पात. एवढचं नव्हे तर वयाची सुद्धा अट नसते, याचे चित्र वेंगुर्ला शहरातील प्रसिद्ध कुडपकर यांच्या गणपतीच्या चित्र शाळेत दिसून येत आहे. कुडपकर यांची चौथी पिढी जी अनुक्रमे आठवी व सहावी इयत्तेत शालेय शिक्षण घेत आहेत ती कु. गुंजन व कु. चिन्मय ही लहान मुले बाप्पा घडविण्यात मग्न आहेत. यांच्यासोबत इयत्ता पाचवी, सहावीतील मुलेही गणपतीचे रंगकाम करीत आहेत.

      आपल्या संस्कृतीतील काही सण-उत्सव हे मनुष्याच्या कलेला वाव देणारे, त्यांना प्रोत्साहन देणारे आणि त्याच्यातून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍नही सोडविणारे आहेत. कोकणातील असाच महत्त्वाचा सण गणेश चतुर्थी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गणपतीच्या सर्वच शाळेत लगबग दिसून येत आहेत. बऱ्याच शाळांमध्ये मूर्तींचे रंगकाम संपुष्टात आले सुद्धा. तर काही ठिकाणी रात्र रात्र जागवून मूर्ती बनविण्याचे काम सुरु आहे. बऱ्याच शाळा मालकांच्या अख्ख्या कुटुंबानेच बाप्पाच्या सेवेत झोकून घेतले आहे. मूर्ती घडविण्याच्या या सेवेत कित्येकजणांच्या पिढ्यान्‌पिढ्या मनोभावे कार्य करत असतानाच वेंगुर्ला शहरातील कॅम्प-भटवाडी येथील कुडपकर यांच्या मूर्ती शाळेत सुदर्शन कुडपकर यांची चिमुकली नातवंडे हातामध्ये रंगाचा ब्रश आणि स्प्रेगन घेऊन गणपती रंगविताना दिसत आहेत. गणपती बाप्पा कसा घडविला जातो हे ज्या वयात दुरुनच पाहिलं जातं त्याच वयात ही लहान मुले मन लाऊन गणपती रंगवित आहेत. त्यांच्यासोबत तनिश धर्णे, यतिन कुडपकर, साहिल कुडपकर, हेमांशु कुडपकर, कार्तिक रेडकर आदी प्राथमिक शिक्षण घेणारी मुलेही अभ्यासातून वेळ मिळेल त्याप्रमाणे गणपती शाळेत येऊन रंगकामाच्या निमित्ताने बाप्पाची सेवा करीत आहेत. कलेचा अधिपती आणि बुद्धीचा दाता असलेला, ज्याच्या हाती या विश्वाची सुत्रे आहेत तोच गणपती या लहान मुलांना बुद्धी देऊन त्यांच्याकडून स्वत:ला साकारुन घेत आहे. हे दृश्‍य पहातच रहावे अशाप्रकारचे आहे.

      सुदर्शन कुडपकर यांच्या वडिलांनी सुरु केलेल्या या गणपतीच्या शाळेत त्यांच्या तिसऱ्या पिढीने यात झोकून घेतले असतानाच चौथ्या पिढीने आपला श्रीगणेशा केला आहे. सध्याचे युग हे मोबाईलचे आहे. मोठ्यांसोबतच लहान मुलांच्याही हातामध्ये मोबाईल दिसून येतो. त्यातील गेम हा तर लहान मुलांचा एक छंदच झाला आहे. असेही असताना ही सर्व लहान मुले मात्र आपली कला साकारत आहेत. मुलं ही अनुकरणप्रिय असतात, याचा उत्तम नमुना इथे पहायला मिळतो. मोबाईलमध्ये नेमके काय पहावे, ती कलात्मक दृष्टी आत्मसात करणारी ही चिमुकली बोटे सराईतपणे बाप्पाचा आकार घडविताना, रंगविताना दिसतात तेव्हा थक्क व्हायला होते. सोशल मिडियाच्या मायाजालात आपण फक्त तक्रारीच करीत राहतो. पण इथे तर या मुलांना एक वेगळाच अद्भूत अनुभूती देणारा खजिना मिळाल्याचे दिसते.

      ज्येष्ठ मूर्तीकारांचे मिळालेले मार्गदर्शन, त्यांनी दिलेला पाठींबा यामुळे लहान मुलांच्या ठिकाणी असलेली भिती दूर झाल्याने मनावर कुठल्याही प्रकारचे दडपण न ठेवता मातीकाम ते रंगकाम असा त्यांचा हा प्रवास निर्विघ्नपणे सुरु आहे. सर्वसामान्यत: माणसाची ओळख ही त्याच्या पिढीजात व्यवसायामुळे, कलेमुळे होत असते. मूर्तीकलेच्या माध्यमातून असलेली आपली ओळख या लहान मुलांनीही जपली आहे आणि यापुढेही जपणार आहेत यात शंकाच नाही.

शब्दांकन- प्रथमेश गुरव, 9021070624

Leave a Reply

Close Menu