शाळा व पोलिस इमारत बांधण्यासाठी केसरकरांना निवेदन

वेंगुर्ला तालुका दौ-यावर असलेल्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्री झाल्यानंतर प्रथमच शिरोडा ग्रा.पं.ला भेट दिली. यावेळी शिरोड्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर शिरोडा ग्रा.पं.सदस्य तथा शिंदे गट शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कौशिक परब यांनी त्यांचे लक्ष वेधले. यात शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात निम्म्या कर्मचा-यांच्या जागा रिक्त आहेत. त्या रिक्त असलेल्या कर्मचा-यांच्या व वैद्यकीय अधिका-यांच्या जागा तात्काळ भराव्यात. तसेच वैद्यकीय अधिका-यांच्या निवासाची व्यवस्था असलेल्या इमारती जीर्ण झाल्याने त्या निर्लेखित करून पुन्हा बांधण्यात याव्यात. शिरोड्यातील प्राथमिक शाळा ही सुमारे १५० पटसंख्येची शाळा आहे. त्या शाळेची इमारत सुद्धा १०० वर्ष जुनी असून ती जीर्ण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर उद्भवणा-या धोक्याचा विचार करता ती इमारत निर्लेखित करून पुन्हा बांधण्यात यावी.

     तसेच शिरोडा पंचक्रोशीसाठी असलेल्या पोलीस स्टेशनची इमारत निर्लेखित करण्यात आली होती. मात्र अद्यापपर्यंत त्याची बांधणी झाली नाही. त्याठिकाणी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. ही तात्पुरती व्यवस्था कधीही कोसळण्याची भीती असल्याने त्याठिकाणी तात्काळ पक्की इमारत बांधण्यात यावी अशी मागणी कौशिक परब यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत याची संपूर्ण माहिती घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. यावेळी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच राहुल गावडे, शिंदे गटाचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, सचिन वालावलकर, जिल्हा बँक माजी संचालक राजन गावडे, समृद्धी धानजी, दिलीप गावडे, प्राची नाईक यांच्यासाहित इतर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu