नाथ पै हे विचारांचे प्रतिक – शिक्षणमंत्री दिपक केसरकर

कोकण ही विचारवंतांची भूमी आहे. नाथ हे विचारांचे प्रतिक आहे. बॅ.नाथ पै यांच्या स्मृती कायम राहण्यासाठी शहरात त्यांच स्मारक होत आहे. ते नुसते स्मारक नसून त्याठिकाणी त्यांची भाषणे, लिखाण पहायला मिळणार आहे. चिपी विमानतळाला बॅ.नाथ पै यांचे नाव देण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य मिळाले आहे. जिल्ह्यासाठी जे जे काही विकासात्मक करता येईल तेच नाथ पै यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बॅ.नाथ पै जन्मशताब्दी सोहळ्याच्या सांगते प्रसंगी केले. तर शरद पवार यांच्याकडून विचारांची देणगी मिळाल्याने आपण मंत्रीपदापर्यंत पोहचू शकलो असेही केसरकर म्हणाले.

      बॅ.नाथ पै जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता 1 ऑक्टोबर रोजी माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात झाली. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला व्यासपिठावर राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, विधान परिषद सदस्य बाळाराम पाटील, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, बॅ.नाथ पै यांचे बालपणीचे मित्र बेळगाव येथील विठ्ठल याळगी, बाबुकाका अवसरे, पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे, राष्ट्रवादीचे नेते व्हिक्टर डॉन्टस, बॅ.नाथ पै स्कूलचे उमेश गाळवणकर, बॅ.नाथ पै फाऊंडेशनच्या अध्यक्ष अदिती पै, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, ख्यातनाम चित्रकार अरुण दाभोलकर, शैलेंद्र पै, पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते.

      कार्यक्रमाची सुरुवात बॅ.नाथ पै यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बलसागर भारत होवो हे गीत सादर केले. बॅ.नाथ पै यांच्या जीवनपटावर आधारित व्हीडिओ क्लिप दाखविण्यात आली. नाथ पै यांचे सुपुत्र आनंद व दिलीप पै यांनी व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. कुडाळ येथील व्हीक्टर डॉन्टस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘असाही एक बॅरिस्टर’ ही नाट्यकृती सादर केली.

      संसदेत काम करीत असताना आपण बॅ.नाथ पै यांच्या मतदार संघातील खासदार आहे हे सांगताना मला फार आनंद वाटतो. मी किती बडेजाव मारला तरी पूर्वीच्या सदस्यांनी केलेले काम महत्त्वाचे आहे. त्यांच्या कामाला गालबोट लागणार नाही हे मी पहात असतो. नाथ पै यांचे स्मारक होण्यासाठी निधीची पूर्तता केली जाणार असल्याचे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी देत बॅ.नाथ पै यांचे कार्य पुन्हा जागृत केल्याबद्दल अदिती पै हिचे विशेष कौतुक केले. तर नाथ पैंची संसदेतील भाषणे पुस्तकरुपाने येणार असून लवकरच त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे करण्याचा मानस असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.

      आपल्या वडिलांनी सुमारे 9 महिने बॅ.नाथ पै यांच्यासोबत कारावास भोगला असल्याचे बाळाराम पाटील यांनी सांगितले. तरुणांना नाथ पै समजले पाहिजेत यासाठी अशाप्रकारचे कार्यक्रम होणे आवश्‍यक आहेत. अशा उपक्रमांसाठी भविष्यात आपल्याकडून नाथ पै फाऊंडेशनला मदत राहील असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

      बॅ.नाथ पै यांचे बालपणीचे मित्र बेळगाव येथील विठ्ठल याळगी यांनी आपल्या भाषणात नाथ पैंच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, बेळगावमधील याळगी कुटुंब आणि नाथ पै यांचे खुप घरोब्याचे संबंध होते. नाथ पै यांचे वाचन अफाट होते. दहा मिनिटाच्यावर बोलायचे नाही असे डॉक्टरांनी सांगितले असतानाही त्यांनी भाषण केले. त्यांच्याठिकाणी असलेल्या प्रामाणिकपणाचे उदाहरणेही दिली.

      व्यासपिठावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच अदिती पै हिचा शरद पवार यांनी सत्कार केला. याप्रसंगी बनविलेल्या नाथ पै यांच्या रजत मोहराचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते केले. प्रफुल्ल वालावलकर, विभा वझे यांनी सूत्रसंचालन केले. तर शैलेंद्र पै यांनी आभार मानले. हा कार्यक्रम बॅ.नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट व बॅ.नाथ नाथ पै शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.

Leave a Reply

Close Menu