सीएसआर निधीतून मिळालेल्या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा 9 रोजी

एजिस फेडरल लाईफ इन्शुरन्स यांच्या सीएसआर निधीतून किरात ट्रस्ट वेंगुर्ला, माझा वेंगुर्ला व अटल प्रतिष्ठान सावंतवाडी यांना देण्यात आलेल्या दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता वेंगुर्ला-कॅम्प येथील मधुसूदन कालेलकर सभागृहामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे कोकण विभाग वैद्यकीय आघाडी प्रमुख डॉ.अमेय देसाई यांनी 2 ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला येथे पत्रकार परिषदेत दिली.

      डॉ.अमेय देसाई यांनी वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी किरात ट्रस्टच्या सचिव सीमा मराठे, माझा वेंगुर्लाचे अध्यक्ष निलेश चेंदवणकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, मोहन होडावडेकर, संजय पुनाळेकर, प्रशांत आपटे, राजन गावडे, कपिल पोकळे आदी उपस्थित होते.

      डॉ.देसाई म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी यापूर्वी कुडाळ रोटरी क्लबला कार्डियाक ॲम्बुलन्स व्हॅन देण्यात आली आहे. आता वेंगुर्र्ला येथील किरात ट्रस्ट व माझा वेंगुर्ला यांना एक व सावंतवाडी येथील अटल प्रतिष्ठानसाठी एक अशा दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. त्यांचे लोकार्पण 9 ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी उपस्थित राहणार आहेत.

      या लोकार्पण कार्यक्रमापूर्वी महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. दुपारी 3 ते 6 यावेळेत हे शिबिर घेण्यात येईल. त्याचा सुमारे 300 ते 400 लोक लाभ घेतील अशी अपेक्षा आहे. या शिबिरात उष:काल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगलीचे तज्ज्ञ डॉक्टर मोफत तपासणी करणार आहेत. यावेळी प्राथमिक औषधोपचारही मोफत देण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया करावी लागल्यास तिही सांगली येथील रुग्णालयात मोफत केली जाणार आहे.

      लोकार्पण सोहळ्यात कोरोना कालावधीत गावपातळीवर काम केलेल्या 25 डॉक्टर व कौन्सिलर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रसार भारती तर्फे सावंतवाडी येथील लाकडी खेळणीवर एक चित्रफित बनविण्यात आली असून त्याचे प्रकाशनही यावेळी करण्यात येणार आहे असे देसाई यांनी सांगितले. प्रशांत आपटे यांनी प्रास्ताविक तर निलेश चेंदवणकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Close Menu