‘चांदणझुला’ कवी संमेलन यादगार

वेंगुर्ला ही मंगेश पाडगावकर व महान संसदपटू बॅ. नाथ पै यांची जन्मभूमी आहे. वि.स.खांडेकर, जयवंत दळवी, चिं. त्र्यं. खानोलकर, गुरुनाथ धुरी, वीरधवल परब अशा साहित्यिकांची साहित्य नगरी आहे. आनंदयात्री वाङ्मय मंडळ हे साहित्यिक आणि वाचक यांचे एक कुटुंब असून कादंबरीकार वृंदा कांबळी या वृंदावनासारख्या या साहित्य दरबाराचे अंगण फुलवित आहेत. कविता ही समाजमनाचा आरसा असते. कवींनी समाजातील दांभिकतेवर प्रहार करावेत. परिवर्तनवादी विचार मांडावेत. परिवर्तन म्हणजे तोडफोड नसून नवनिर्मिती होय. तिन्ही काळांच्या भाळावर उभी राहणारी रचना म्हणजे कविता असते. वेदनांना शब्द देते, शोषितांना धीर देते आणि शोषकांच्या विरोधात आवाज उठविण्यास मदत करते ती कविता. अंतर्मुख करणारी कविता अधिक जीवंत असते असे सांगून कविता ही एक अध्यात्म असते, वेंगुर्ल्यातील आनंदयात्री वाङ्मय मंडळ म्हणजे कलाविष्काराचे केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन चांदणझुला या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना विठ्ठल कदम यांनी केले.

      आनंदयात्री वाङ्मय मंडळ, वेंगुर्ला यांच्यावतीने कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून सुंदरभाटले-वेंगुर्ला येथील साई दरबार हॉलमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन कवी विठ्ठल कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी, आनंदयात्रीचे प्रतिनिधी डॉ. संजीव लिंगवत, सत्कारमूर्ती संजय पाटील, महेश राऊळ आदींचा समावेश होता.

      संजय पाटील यांना विद्यापीठाचा सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सामाजिक कामातील विशेष योगदानाबद्दल सर्पमित्र महेश राऊळ व प्रा. सचिन परुळकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

      कवी संमेलनात वेंगुर्ला तालुक्यातील 25 नवोदित कवींनी कविता सादर केल्या. प्रीतम ओगले यांनी प्रास्ताविक, निवेदन प्रा. सचिन परुळकर यांनी केले. कवी संमेलनाचे निवेदन कौलापुरे सर यांनी केले. संजय पाटील यांनी आभार मानले. कवी संमेलनाला ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, अजित राऊळ, सॅमसन काळे, डॉ. पूजा कर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu