प्रामाणिक पत्रकारितेची शिक्षा!

        पत्रकारांनी प्रामाणिक असावं, निःपक्ष असावं, निर्भीड असावं, जनतेच्या बाजूनं रोखठोक भूमिका त्यांनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा समाजाची असते. हरकत नाही. परंतु या गुणांची जी शिक्षा भोगावी लागते ती किती भयानक असते, याचा प्रत्यय शशिकांत वारिशे या पत्रकाराच्या हत्या अगर संशयास्पद मृत्यू नंतर समोर आलेल्या घटना आणि उलटसुलट प्रतिक्रिया पाहून निष्ठेनं, प्रामाणिकपणे पत्रकारिता करणा­या पत्रकारांची अवस्था किती विदारक असू शकते आणि त्यांचा संसार कसा ‘‘उजाड‘‘ झालेला असतो हे दिसून आले.

      कोकणातील नाणार रिफायनरी आंदोलनातील विरोधाला आवाज देणारे पत्रकार शशिकांत वारीशे याची निर्घृण हत्या झाल्याचा आरोप आहे. यातील संशयित आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राज्यातील वर्तमानपत्रे, इलेक्ट्राॅनिक मिडिया यांनी हा विषय सातत्याने लावून धरला.स्थानिकांचा संताप आणि राज्यभरातुन येणा­या तीव्र प्रतिक्रिया पाहता सरकारने सावध भूमिका घेतली आहे. मंत्री उदय सामंत यांनी वारिशे यांच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत शासनाच्या वतीने जाहीर केली आहे. मुलाच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या हत्येप्रकरणी एस.आय.टी. जाहीर केली आहे.

      हे प्रकरण समोर येताच सोशल मीडियावर पत्रकार वारिशे यांच्याबद्दल अपप्रचार करणा­या पोस्ट फिरविण्यात आल्या. शशिकांत यांनी गैरमार्गांनी पैसे कमविले असेही बोलले जात होते. एका प्रामाणिक पत्रकाराच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूनंतर अशा बदनामीला समोरे जावे लागले, हे अत्यंत वेदनादायी आहे.

    मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षा जान्हवी पाटील यांनी संघटनेच्या पदाधिका­यांसह वारिशे यांच्या घरी कशेळी गावी भेट दिली तेव्हा परिस्थिती अत्यंत विदारक होती. दुर्गम भागातल्या या गावच्या परिसरातच भययुक्त शांतता दिसत होती. लोक तर होते पण पुढं येऊन बोलायला कोणी तयार नव्हतं. शशिकांत यांचे घर म्हणजे जेमतेम चार-पाच माणसं बसतील एवढीच खोली. पक्क घर नाही. मातीनं सारवलेल्या भिंती. ओसरी मातीचीच. ती शेणानं सारवलेली. एक लोखंडी कपाटमातीच्या चुलीच्या आसपास पडलेली दोन चार भांडी. किराणा सामानही कुठं दिसलं नाही. शेजारी वृध्द मातोश्री खाटेवर पडलेल्या. शशिकांत यांचा हा  तुटपुंजा संसार. ना जमीन, ना त्यांचं बँक बॅलन्स, ना कोणता बिझनेस. पत्रकारितेतून मिळणा­या तुटपुंज्या पगारावर हा कसाबसा संसार चालवत होते. म्हणतात ना, श्रीमंती ही वेशभूषेवरून जशी कळते तशीच ती घरावरूनही दिसते. घराचा अवतार आणि माणसं पाहून शशिकांत  हे चुकीचं काही करीत असतील या गोष्टीवर कोणीच विश्वास ठेवणार नाही. गेली अनेक वर्षे याच अवस्थेत शशिकांत यांची आई, त आणि मुलगा इथं नांदत होते, असं शेजारी सांगत होते.

      पत्रकारांनी प्रामाणिक रहात, लेखणीशी इमान राखत पत्रकारिता करावी अशी समाजाची अपेक्षा असते. त्यात वावगे असे नाही. कारण लोकशाहीचा चौथा खांब म्हणून काम तो करत असतो, त्या भूमिकेतून पत्रकाराकडे पाहिले जाते. पण जेव्हा पत्रकारच अडचणीत येतो, तेव्हा कोणीच त्याच्या, किवा त्याच्या कुटुंबाच्या बरोबर असत नाही. कदाचित प्रामाणिकपणाची ही शिक्षा असेल. शशिकांत वारीशे याचं कुटुंब याच प्रामाणिकपणाची आज शिक्षा भोगतंय का? माहीत नाही. परंतु प्रामाणिक पत्रकारांबरोबर समाज म्हणून आपण सगळे आहोत का? हा खरा प्रश्न आहे. दरवेळेस माझ्यापर्यंत किवा माझ्या घरात गोष्ट झाली तर आपण बघू असे सांगून हात झटकून किती काळ राहणार आहोत? दिवसाढवळ्या एका पत्रकाराचा खून होतो आणि त्याची अपेक्षित तीव्र प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातून म्हणावी तशी उमटलेली नाही.

त्यामुळे आपल्या संवेदना बोथट झाल्या आहेत का? किवा कुठच्या राजकिय पक्षाच्या अधीन झाल्या आहेत का याचा विचार करायला हवा.

      मार्टिन निमोलर या कविच्या गाजलेल्या चार ओळी ज्या कुडाळ येथील साहित्यिक अंजली मुतालिक यांनी अनुवादीत केल्या आहेत, त्या सर्वांनाच विचार करायला लावणा­या आहेत. पहिल्यांदा ते आले कम्युनिस्ट लोकांसाठी, आणि मी काही बोललोच नाही, कारण मी कम्युनिस्ट नव्हतो.

त्यानंतर ते आले कामगार संघटनेसाठी…

मी काहीच बोललो नाही.

कारण मी कामगार संघटनेत नव्हतो.

त्यानंतर ते आले ज्यू लोकांसाठी….

मी पुन्हा काहीही बोललो नाही.

कारण मी ज्यू नव्हतो.

पुन्हा ते आले माझ्यासाठी….

आता यावेळी कोणीही शिल्लक राहिलं नव्हतं जो माझ्यासाठी बोलू शकेल

किवा आवाज उठवू शकेल…

Leave a Reply

Close Menu