ज्ञानदा शिशुवाटीकेचे स्नेहसंमेलन संपन्न

विद्याभारती संचालिका कांचन दामले यांनी हाती घेतलेले ज्ञानदा शिशुवाटीकेचे कार्य कौतुकास्पद आहे. कोरोना काळात लोक एकमेकांच्या संपर्कात येणं टाळत होते. असे असतानाही मुलांच्या भविष्यासाठी स्वत:चा विचार न करता त्यांनी शिशुवाटीका सुरु ठेवली. यावेळी पालकांनीही त्यांच्यावर टाकलेला विश्‍वासही तेवढाच महत्त्वाचा आहे. असे प्रतिपादन वेतोरा केंद्रप्रमुख नितीन कदम यांनी ज्ञानदा शिशुवाटीकेच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. सदाशिव पाटील-सरपंच पालकरवाडी, प्रमुख पाहुणे सौ. प्राची नाईक-सरपंच वेतोरे वरचीवाडी, श्री.आबा नाईक-देवस्थान कमिटी अध्यक्ष, ज्ञानेश्‍वर हरमळकर – पदवीधर शिक्षक शाळा वेतोरे नं.1, श्री. विश्‍वनाथ जांभवडेकर-पदवीधर शिक्षक शाळा वेतोरे नं.1, श्री. आत्माराम बागलकर आदी उपस्थित होते.

      मुलं कोरोनाच्या काळामध्ये थोडी लाडावली गेली आहेत. मुलांच्या हातात मोबाईल आल्यामुळे वाचनापासून दूरावली. अभ्यासाऐवजी मोबाईलमध्ये रमू लागलीत. पालकांची मानसिकता देखील बदलत चालली आहे. मोबाईल आजचा कळीचा मुद्दा झाला आहे. मुलांचा उत्कर्ष होण्यासाठी मोबाईल पासून दूर रहाणे आव्हानात्मक असले तरी अशक्य नाही, असे मत संचालिका सौ. कांचन दामले यांनी व्यक्त केले.

      मान्यवरांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. झगमग झगमग, परी कथेच्या पऱ्या, चिऊ चिऊ चिमणी, कोळी नृत्य, शेतकरी नृत्य, एकपात्री, छोटी नाटुकली इ. रंगतदार कार्यक्रम संपन्न झाले. सर्व मातांनी केलेले शिवाजी महाराजांचा पाळणा हे नृत्य खास आकर्षण ठरले.

Leave a Reply

Close Menu