आंतरराष्ट्रीय योगदिवस

2015 साली आपण पहिला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला. केवळ साजराच नाही तर ‘योगशास्त्राचे’ संपूर्ण जगभर ब्रँडींग केले आणि आपण योगशास्त्राचे पेटंट घेतले. आणि या पेटंटमुळे या योगशास्त्रावर आता कुणीही आपला हक्क सांगणार नाही. आपल्या गौरवशाली परंपरेचा भाग असणारे ‘योगशास्त्र’ यावर आपले वर्चस्व अबाधित राखले. याचे श्रेय जाते ते आपल्या सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना. ‘योग’ म्हणजे भारत आणि भारत म्हणजे योग अशी ओळख संपूर्ण विश्‍वभर निर्माण केली. ‘विश्‍वाचे नेत्तृत्व’ करण्यासाठी आणि ‘विश्‍वगुरु’ बनण्यासाठी आपली वाटचाल सुरू झाली.

      21 जून 2015 पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे घोषवाक्य होते ‘YOGA FOR HARMONY AND PEACE’ संपूर्ण विश्‍वाबरोबर सुसंवाद साधण्याचा प्रयत्न आणि शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न. आता यानंतरची घोषवाक्ये आपण पाहिली तर *2016 – ‘YOGA FOR THE ACHIVEMENT OF THE SUSTANABLE DEVELOPMENT OF GOAL.’ *2017- ‘YOGA FOR HEALTH’. *2018- ‘YOGA FOR PEACE’ *2019- ‘YOGA FOR HEART’ *2020- ‘YOGA AT HOME AND YOGA WITH FAMILY’ *2021- ‘YOGA FOR WELL-BEING’ *2022- ‘YOGA FOR HUMANITY’. *2023- ‘VASUDHAIV KUTUMBAKAM.’

      वरील सर्व घोषवाक्ये पाहिली तर असे लक्षात येईल की भारत हा एकमेव असा देश आहे, जो ‘सर्वे भवंतु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणी पश्‍चंतु या कश्‍चित दुःख भाग भवेत॥’ प्रमाणे स्वतःबरोबरच संपूर्ण विश्‍वाशी सुसंवाद-शांती-स्वास्थ्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने कधीही कुणावर आक्रमण केले नाही, कधीही कुणाचा प्रांत-देश-भूप्रदेश बळकावण्याचा प्रयत्न केला नाही ना कुण्या दुसऱ्या देशावर युद्ध लादण्याचा प्रयत्न केला.

      प्रभु रामचंद्र, श्रीकृष्ण, गौतमबुद्ध, भगवान महावीर यांचा वारसा सांगणारा हा देश आज विश्‍वशांती, बंधुभाव-सहयोग-सहकार्य यासाठी प्रयत्न करत आहे. जगात कुठेही भूकंप, अतिवृष्टी, महापूर आले तर मदत पाठवणारा भारत हा पहिला देश ठरत आहे. कोरोना काळात तर आपण विकसित प्रगत राष्ट्रांना व्हक्सीन पाठवली. गरीब देशांना मोफत दिली. भारत नेहमीच मानवतेच्या भावनेने वागला. आपल्या सर्व योग दिनाची घोषवाक्ये हेच सांगतात की, संपूर्ण विश्‍वातील मानवतेचा विकास.

      जगासमोर महत्त्वाचे प्रश्‍न आहेत ते म्हणजे भूकबळी, बेरोजगारी, महागाई त्याचबरोबर मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर, स्थूलत्त्व सोबतीने नैराश्‍य, उदासीनता, अनिद्रा, चिंता-काळजी अशा अनेक मानसिक रोगांचा उद्रेक. या आजारांची टक्केवारी पाहिली तर 1) मधुमेह – 9.3 % आणि आता 10.2 % पर्यंत वाढले आहे. 2) हृदयरोग- 5 % (375476 लोक 2021 मध्ये) 3) कॅन्सर – 19.3 दशलक्ष यापैकी 10 दशलक्ष मृत्यू 2020 सालामध्ये. जगात 5.5 % लोक कॅन्सरग्रस्त होतात. 4) मानसिक आजार- 13 % लोक कोणत्या ना कोणत्या मानसिक विकाराने ग्रस्त आहेत. उदाहरणादाखल आपण तीनचारच आजार घेतले.

      आज जगाचे शरीरस्वास्थ आणि मन स्वास्थ दोन्ही हळूहळू हरवत चालले आहेत. संपूर्ण जगभरातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारचा ताण शारीरिक-मानसिक स्तरावर सहन करत आहे. या सर्वातून मुक्त व्हायचं तर योग मार्गाची कास धरणं अनिवार्य आहे. योग ही एक जीवनशैली आहे. Yoga is a art of life, how to live it and it is aslo science of life how to discipline it. म्हणूनच ‘योग’ आपल्याला जीवनशैली आणि दिनचर्या बनवावी लागेल. योग म्हणजे शरीर, मन, आत्मा यांचे संतुलन. योगाची जीवनशैली अंगीकारुन आपल्याला शरीर-मनाने आणि बुद्धीने सुदृढ, संतुलीत, स्वस्थ व्हावे लागेल. वेळीच जागे होऊन शरीर, मनाचे स्वास्थ्य कमवावे लागेल. म्हणून योगमार्गाचा अवलंब करणे अत्यावश्‍यक आहे.

      भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अगदी सोप्या शब्दात, अगदी दोन ओळीच्या श्‍लोकात सांगितले आहे-

युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्ना-व-बोधस्य, योगो भवति दुःखहा ॥ भ.गी. 6.17॥

      योग्य आहार, योग्य विहार (विश्रांती), योग्य कर्म, योग्य विचार, योग्य वर्तणुक केल्याने ‘योगो भवति दुःखः॥’ योग सर्व दुःखाचा नाश करील. म्हणजेच ‘योग’ हा सर्वावरचा रामबाण उपाय आहे.

      रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून प्रयत्न करावा. या उक्तीनुसार आज आपण योगाचा अंगीकार केला तर भविष्यात आपल्याला मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर, सांधेदुखी, मनोविकार असे आजार होणार नाहीत आणि झालेच तर त्यांचा चांगला प्रतिकार करुन आपण त्यातून बाहेर पडू.

   आपणच केलेल्या पर्यावरणाच्या हानीमुळे पर्यावरणाचे झालेले नुकसान, ग्लोबल वार्मिंग, समुद्राच्या पाण्याची वाढलेली पातळी, बिघडलेले ऋतुचक्र, कुठे महापूर, अतिवृष्टी, कुठे भूकंप, दुष्काळ, कुठे युद्ध आणि यातच कोरोनासारखी संकटे येत आहेत, येत राहतील आणि यात होरपळणार आहे मानवजात.

   आता आपल्याच हातात आहे आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवणं आणि स्वतःला आजारी पडू न देणं. यासाठी योगाची कास धरू. मन-बुद्धी-अहंकार-चित्त-आत्मा यांचं योग्य संतुलन साधू. कृष्ण भगवद्गीतेत सांगतो त्याप्रमाणे-

शनैः शनैः उपरमेत्‌ बुद्ध्यात धृति गृहितया ॥ आत्मसंस्थ्यं मन कृत्वा न किंचित अधि चिंतयेत ॥भ.गी. 6/25॥

   मन-बुद्धी-अहंकार-चित्त यांचं योग्य संतुलन आणि शरीर यांचा सुंदर समेळ घालू म्हणजे कोणत्याही प्रकारची चिंता, काळजी आपल्याला उरणार नाही.

   गेले तीन महिने माझे वास्तव्य जर्मनीमध्ये होते. तिथे पाहिलं तर दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा लोक व्यायाम करतात. हेच नेदरलँड आणि स्वीडन याही देशात. खूप वाचतात. निसर्गाच्या सान्निध्यात जास्तीत जास्त वेळ काढतात. कुणी धावतात, कुणी चालत असतात, कुणी योगा, कुणी सायकल चालवणे, पण सतत काहीना काही व्यायाम करतात. संपूर्ण जगातून 300 मिलीयन लोक योग प्रॅक्टीस करतात. आपण पाश्‍चात्यांचं अनेक बाबतीत अनुकरण करतो. ज्याचे महत्त्व आपले असुनही त्यांनी ओळखले. म्हणूनच केवळ पेटंट आहे असे म्हणून हरखून जाण्यापेक्षा कृतीतूनही सुदृढ भारत हे स्वप्न साकारूया. याही गोष्टीचं करूया आणि खूप आनंदी, उत्साही, सकारात्मक राहू. आपले जीवन समाधानाने – सुदृढ मन आणि सुदृढ शरीराने हत खेळत जगूया. नवव्या आंतरराष्ट्रीय दिनाच्या शुभमुहुर्तावर हाच निश्‍चय करू, जणू भीष्मप्रतिज्ञाच.

-डॉ. सौ. वसुधा ना. मोरे, B.A.M.S., D.Yoga, M.S. Yoga (Ph D. Schotor) 7774876395

Leave a Reply

Close Menu