तीन दिवसांत चाकरमान्यांनी बांधली सोळाफुट खोल चिऱ्याची विहिर

अद्यापही चाकरमान्यांना आणि गाववाल्यांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवते आहे. विहिर बांधावी तर ती बांधणारे कारागिर, मजुर मिळणं कठीण. यावर नुसतं गप्प बसण्याऐवजी  सुट्टीवर गावात गेलेल्या सहा चाकरमान्यांनी चक्क सोळा फूट खोल विहिर खोदली. चाकरमान्यांच्या या अनोख्या कर्तबगारीने गाववाल्यांपुढे नवा आदर्श घालून दिल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामविकासासाठी धडपडणाऱ्या सहा चाकरमान्यावर विविध स्तरामधुन कौतुकाचा वर्षाव होत आहे .

      सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यात पाल या छोट्याशा  खेड्यातल्या तळेबांधवाडीतील गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या चार ध्येयवेड्या चाकरमान्यांनी पाणीटंचाईवर मात केली आहे.लिलाधर गावडे, नंदादीप गावडे, प्रफुल्ल गावडे, किशोर गावडे, डॉ. शत्रुघ्न  गावडे, ज्ञानेश गावडे हे सहा ध्येयवेडे मुळचे गावातले आणि व्यवसायानिमित्त मुंबईत असतात. मे महिन्यात शेवटच्या पंधरवड्यात दरवर्षीप्रमाणे गावात आपल्या कुटुंबियासोबत तळेबांधवाडी इथे आपल्या घरी आले होते. यंदा मृग कोरडा गेल्यामुळे पाण्याची टंचाई जाणवू लागल्यावर आपल्या घराशेजारी पाणीसाठा असल्याचं माहित होतं. साठा कसला डबकंच होतं. त्या डबक्याच्या जागी छोटी चिऱ्याची विहिर बांधण्याचं निश्‍चित केल्यावर या चारजणांनी विहिर बांधणाऱ्या कारागिर, मजुरांचा शोध घेण्यासाठी तालुका पालथा घातला. मात्र शेवटच्या पंधरवड्यात सगळेजणच व्यस्त असल्याचं जाणवलं. मात्र या जिद्दीने पेटलेल्या या चाकरमान्यांनी हार मानली नाही. कुठलीही सरकारी मदत-अनुदान न घेता आणि स्वत:च्या दैनंदिन अनुभवाच्या जोरावर चिऱ्याची विहिर बांधण्याचं सहाजणांनी निश्‍चित केलं.

      लिलाधर आणि किशोर यांना गावातल्या घरबांधणीची जुजबी माहिती होती त्याप्रमाणे सोळा बाय सहा विहिरीसाठी लाकडी कंपास बनवला, पाचशे दगडी जिरे, सहा गोणी सिमेंट मागविली. रेती आधीच्या बांधकामाची शिल्लक होतीच. मे च्या पहिल्या आठवड्यात जेसीबीच्या सहाय्याने पंधरा फुटापर्र्यंत विहिरीसाठी खोदून ठेवलेलं होतं. मेच्या शेवटच्या आठवड्यात चौघांनी अंगमेहनतीने सोळा फूट खोल चिरे गरजेप्रमाणे उतरवत किशोरनी चिऱ्याचं ‘अत्रसात’ बांधकाम करत दहा फूट खोलीचं बांधकाम दिड दिवसांत पूर्ण केले. उर्वरीत दिड दिवसांत जमिनिवरच्या कठड्याचं रहाटासकट बांधकाम पूर्ण केलं. आता सहा फूट पाणी असल्यामुळे पाण्याची समस्या दूर झाली होती. तळेबांधवाडीत एक नवी विहिरबांधवाडी वास्तवात आली होती, आपल्या सहाजणांच्या हातून एवढं बांधकाम होईल का? असा विचार या चाकरमान्यांच्या मनात आला होता. मात्र त्यांच्या बायका, काकी, मुंबईतल्या भावंडांनी जे काही प्रोत्साहन दिलं त्यामुळे विहिर बांधणीला रेड्याचं बळ मिळाल्याचं सहाही झपाटलेले गावडे चाकरमानी घरच्यांचं श्रेय असल्याचं मान्य करतात. या सहा चाकरमान्यांच्या असामान्य कामगिरीची बातमी पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि शिक्षणमंत्री दिपक केसरकरांपर्यत पोहचली असून मुंबईत छोटेखानी समारंभात सत्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Close Menu