केंद्रीय शहर सौंदर्यीकरण स्पर्धेसाठी वेंगुर्ला न.प. सज्ज

      महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांकासह 15 कोटी रुपयांचे बक्षीस पटकावल्यानंतर  वेंगुर्ला नगर परिषदेने केंद्रीय शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत सहभाग घेतला आहे. सौंदर्यीकरणात शहरात विविध उपक्रम राबवित असलेली वेंगुर्ला न. प. या स्पर्धेत सुद्धा निश्‍चितच अव्वल ठरून बक्षिसपात्र ठरेल असा विश्‍वास मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी व्यक्त केला आहे.

      केंद्रीय शहर सौंदर्यीकरण उपक्रमाअंतर्गत उद्याने, हरित जागा, वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट (किनारा सुशोभिकरण), बाजारपेठ सुशोभिकरण, पुरातन वास्तू संवर्धन व सुशोभिकरण अशा चार प्रकारात सर्व प्रकारच्या अद्ययावत सेवा-सुविधा पुर्णत्वास आणलेल्या आहेत. त्यांचे चित्रीकरण करून 15 जुलैपर्यंत केंद्राच्या निवड समितीकडे सादर करावयाचे आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी युद्ध पातळीवर काम करीत आहेत. यामध्ये सर्व माजी लोकप्रतिनिधी, शहरातील सर्व सामाजिक संस्था, व्यापारी संघ व नागरिक यांचे सहकार्य लाभत आहे.

      केंद्रीय स्तरावरील शहरी सौंदर्यीकरणात महत्त्वाचे घटक निश्‍चितीमध्ये हरित जागा प्रकारात वेंगुर्ले न.प.ने घोडेबाव गार्डन निश्‍चित केले आहे. या उद्यानात स्पर्धेसाठी असलेले सर्व घटक न.प.ने पूर्ण केलेले आहेत. यात पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, सोलार माध्यमातून वीज निर्मिती, विद्युत रोषणाई, कारंजे, ग्रीन स्पेस (लॉन) या भागातील पाल्यापाचोळ्यापासून खत निर्मिती, फुलपाखरांची वर्दळ ज्या झाडांमुळे वाढते त्यांची लागवड केल्याने गार्डन ग्रीन पेसने आकर्षित बनविलेला आहे. या भागात पाळीव प्राणी किंवा भटकी जनावरे येऊ नयेत यासाठी गेटची निर्मिती तसेच गार्डनमध्ये बसण्यासाठी आरामदायी सोप्यांची बैठक व्यवस्था, गार्डनमध्ये येणाऱ्या लहान मुले, तरूण, ज्येष्ठ तसेच दिव्यांगांना येण्या-जाण्यासाठी सोयीस्कर रस्ते व बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. व्यायाम करण्यासाठी सायकलिंग ट्रॅक, रनिंग ट्रॅक, जॉगिंक ट्रॅक, विविध प्रकारचे खेळाचे साहित्य व त्यातून व्यायामासाठी साधने बसविण्यात आली आहेत. टाकाऊ वस्तूंपासून बनविण्यात आलेल्या आकर्षक कलाकृतीही गार्डनमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. परिसरात सर्व प्रकारची वाहने मोफत पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

      दुसऱ्या प्रकारात वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट किनारा सुशोभिकरण व सोयी, सुविधा यामध्ये नगरपरिषदेने बंदर रोड लगत जलबांदेश्‍वर या ठिकाणी समुद्राचा आनंद लुटण्यासाठी व शुद्ध स्वच्छ हवेसाठी खास बनविलेले पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तात्पुरते मोबाईल शौचालय व स्वच्छतागृह तसेच ग्रीनस्पेस दृष्ट्या स्थानिक प्रजातीची झाडे निर्माण केली आहेत. यात नारळ, गुळवेल, वड, पिंपळ अशा झाडांची निगा ठेवलेली आहे. पालापाचोळी व अन्य कचरा एकत्र करण्यासाठी डस्टबीन ठेवण्यात आली आहेत. येथील स्वच्छतेसाठी स्वच्छतादूत ठेवण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था तसेच टाकाऊ टायरपासून बनविलेली शोभिवंत खुर्ची, बाहुली ठेवण्यात आली आहे. पर्यटकांना बसण्यासाठी सिमेंटच्या गोलाकार सोप्यांची बैठक व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच लाईटचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या भागात स्थानिक हौशी कलाकारांचे आर्ट गॅलरीचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या भागात येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक पातळीवरचे खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी पथवर्तीय स्टॉल धारकांना जागा देण्यात आल्या आहेत. याठिकाणी झुलता पूल येथे बोटिंगचा उपक्रमही नियोजित आहे. येथे लायटिंगची व्यवस्था, पार्किंग सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

      तिसऱ्या प्रकारात बाजारपेठ, मच्छी-भाजी मार्केट या दोन्ही मार्केटच्या अंतर्गत माल, मच्छी विक्रेत्यांसाठी बसण्याची सोय, सर्व सुविधा, दिव्यांगासाठी रॅम्प तसेच व्हर्टिकल गार्डन्स, कुंड्यात शोभिवंत झाडे लावण्यात आलेली आहेत. चौथ्या प्रकारात हेरिटेज इमारत आहे. त्यादृष्टीने न.प.ने 1876 मध्ये जिल्हाधिकारी आर्थर क्रॉफर्ड यांनी बांधलेली क्रॉफर्ड मार्केटची सुमारे दीडशे वर्षापूर्वीची इमारत न.प.ने हेरिटेज करुन सुशोभिकरण केले आहे. या इमारतीच्या खाली विविध व्यावसायिकांना भाड्याने गाळे दिले आहेत. तर वरच्या मजल्यावर कौन्सिल सभेसाठीचा शिवाजी महाराज सभागृह विधानसभेच्या सभागृह रचनेप्रमाणे बांधला आहे. नगर परिषदेने केलेली विकासकाम, स्वच्छता, सौंदर्यीकरणाची कामे ही नागरिक, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, शहरातील विविध संस्था, व्यापारी, मित्रमंडळे तसेच प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतादूत यांच्या सहभागातून असल्याने केंद्रीय शहर सौंदर्यीकरणात निश्‍चितच नगरपरिषदेला क्रमांकासह बक्षिसही मिळेल असा विश्‍वास कंकाळ यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Close Menu