राजकारणाचा ‘पोत‘ बदलला…प्रभूंचा राजकीय प्रवास थांबला…

जानेवारी २०२२ मध्ये कोकणचे सुपूत्र, केंद्रीय मंत्रिमंडळात आठहून जास्त विभागांचं ज्यांनी जनताभिमुख आणि सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून प्रभावी काम केले, ज्या मतदारसंघाला स्व.नाथ पै, स्व.मधू दंडवते अशा सदाचारी आणि आदर्श प्रतिमा असलेल्या नेत्यांची परंपरा जपली असे कोकणचे सुपूत्र सुरेश प्रभू यांनी आपण यापुढे राजकीय व्यासपीठावर काम करणार नाही तर सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाणार असल्याचे जाहीर केले. अर्थात एक राजकीय विश्लेषक आणि त्यांचा हितचिंतक म्हणून जरी हा सुरेश प्रभू यांचा वैयक्तिक निर्णय असला तरी तो त्यांनी अगदी सहजपणे घेतलेला नाही.

      प्रत्येकाची प्रकृती (शारीरिक नव्हे) ही वेगवेगळी असते. सध्याच्या राजकारणाला प्रभूंची स्टाईल ही मुळीच मानवणारी नाही. राजकारणात जेव्हा संधी मिळेल तेव्हा सत्तेचा दुरुपयोग करून वाममार्गाने मिळवलेल्या संपत्तीच्या जोरावर अनेक वर्षे सत्तेच्या राजकारणात प्रस्थापित होणे हे प्रभूंच्या कार्यशैलीत कधीच बसणारं नाही. सध्याच्या राजकारणात नामचीन गणगांचे स्वागत अगदी लाल कार्पेट घालून आणि बॅन्डबाजा वाजवून केले जाते. अशावेळी वाममार्गाने कमावलेल्या पैशांच्या जोरावर पोसलेल्या झुंडी समर्थन देण्यासाठी बेंबीच्या देठापासून बोंबलत असतात. दौ­याच्यावेळी शेकडो गाड्यांचा ताफा, झेड दर्जाची सुरक्षितता व कार्यकर्त्यांच्या झुंडी असं चित्र पहायला मिळत. मात्र, प्रभूंच्या बाबतीत हा देखावा चुकूनही कधी पहायला मिळाला नाही, उलट यांच्या दौ­याच्यावेळी जी मानवंदना द्यायची प्रथा होती ती त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री असताना बंद केली.

      आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेचा उपयोग करून केंद्रीय मंत्री म्हणून ज्या ज्या खात्यांचा कारभार करण्याची संधी मिळाली त्याचं त्यांनी सोन केलं. आज नागरी उड्डाण मंत्रालयायाची जी उडान योजना आहे त्याचे जनक हे सुरेश प्रभू आहेत. रेल्वेमंत्री असताना अवघ्या काही कालावधीत रेल्वेच्या व्यवस्थापनात आणि सुविधामध्ये केलेले अमुलाग्र बदल हे सामान्य रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारे होते. देशातील रेल्वे मार्गाचे जाळे ज्यात अगदी लेह, लडाखपर्यंत विणले गेले ते प्रभूच्यांच काळात.

      देशाचे उर्जामंत्री असताना महाराष्ट्रात एन्रॉन प्रकल्प वादाच्या भोव­यात सापडलेला असताना या क्षेत्राच्या नियमनासाठी त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे याही क्षेत्रात सकारात्मक परिणाम पहायला मिळाले. अटलजींच्या काळात उर्जामंत्री म्हणून अतिशय प्रभावी काम करत होते अशावेळी हिदुहृदयसम्राटबाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला. खरं तर नव्वदच्या दशकापासून राजकारणाचा पोत बदललायं. एखादा मंत्री हा जनकल्याणा -साठी किती प्रभावी कामं करतो यापेक्षा तो मंत्री पदाचा वापर करून पक्षासाठी किती मलिदा देतो यावर त्याचे राजकीय भवितव्य व संधी अवलंबून असते. जेव्हा त्यांनी राजिनामा दिला तेव्हा तो अटलजींनी स्विकारला नाही. कारण, उर्जामंत्री म्हणून त्यांनी केलेलं प्रभावी काम. अटलजींनी बाळासाहेबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण बाळासाहेबांनी एकदा ठरवलं की ते आपल्या भूमिकेशी ठाम असायचे. काही दिवस राजिनाम्यावर निर्णय होत नव्हता, उर्जामंत्री म्हणून देशाला प्रभूंची किती गरज आहे हे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र आपल्या अग्रलेखातून मांडत होते. पण शेवटी प्रभू आपल्या तत्त्वानुसार बाळासाहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून त्यांनी अटलजींना विनंती केली आणि उर्जामंत्री पदाचा कार्यभार सोडला.

     पर्यावरण, उद्योग, हवाई वाहतूक, खत व रसायन मंत्री, उर्जामंत्री, नद्या जोडणी या देशाच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे अध्यक्ष अशा विविध जबाबदा­या निष्ठेने आणि पारदर्शीपणे पार पाडत असताना फक्त आणि फक्त राष्ट्र निर्माणाच्या कामाचा ध्यास घेऊन झपाटून काम केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेर्पाम्हणून दिलेली जबाबदारी पार पाडत असताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली. साधारण दिड वर्षापूर्वी केंद्रात नव्याने निर्माण झालेल्या सहकार मंत्रालयाचे सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्रातील भविष्यातील आव्हानांचा विचार करून सहकार क्षेत्रात आवश्यक बदल करण्यासाठी गठीत केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी प्रभू कार्यरत आहे.

      पंतप्रधान हे वारंवार आपल्या सहकारी मत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेत असतातं. अशावेळी माझ्यासारख्या या देशातील सामान्य नागरिकांना प्रश्न पडतो की, जर सध्याच्या केंद्रिय मंत्रिमंडळातील काही खात्याचे सहकारी मंत्री पंतप्रधानांना अपेक्षित प्रभावी काम करत नाहीत तर मगप्रभूंसारख्या प्रामाणिक, अनुभवी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणात विशेष ओळख असलेल्या नेत्याला का संधी दिली जात नाही?

     निवडणूकांचं राजकारण हे सुरेश प्रभूंच्या कार्यशैलीला कधीचं पेलणारं नाही. याबाबत मला एक किस्सा आठवतो. साहेब शिवसेनेत असताना लोकसभेची उमेदवार कुणाला द्यावी? याची चाचपणी करण्यासाठी मातोश्रीवर या मतदारसंघातील प्रमुख पदाधिका­यांची उद्धव ठाकरे यांनी मिटींग बोलावली. तेव्हा विद्यमान खासदार विनायक राऊत की सुरेश प्रभू? तेव्हा एका जेष्ठ नेत्यांने उद्धव ठाकरे यांच्याकडे आपले मत मांडताना असे सांगितले की, ‘आपल्या समोर अतिशय ताकदवान उमेदवार आहे. त्यांच्या बरोबर लढायचे तर ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पोस्ट ग्रॅज्युएटचालणार नाही. शंभर किलो वजन उचलणारा पहेलवान पाहिजे.‘‘ पण अशी भूमिका मांडणा­या पदाधिका­यांना हे माहीत नव्हत की, केंद्रात युपीएचं नरसिंहराव यांचे सरकार असताना आणि देशाचे अर्थमंत्री मनमोहनसिंग असताना देशाला आर्थिक संकटातून सहीसलामत बाहेर काढणारे अर्थमंत्री हे ऑक्सफर्ड विद्यापीठाचेच पोस्ट ग्रॅज्युएट होते. साहेबांनी राजकारणाला दिलेल्या पूर्णविरामामुळे भले त्यांच वैयक्तिक नुकसान झाले नसेल पण या देशातील सामान्य माणसाचं आणि संपूर्ण देशात त्यांच्या स्वच्छ प्रतिमेला आणि समाजाभिमुख कार्यशैलीला मानणा­या लाखो लोकांचे नुकसान झाले, हे मान्य करावेच लागेल. कारण काहीही असो, पण सुरेश प्रभूंसारखा दिशादर्शक आणि दूरदर्शी नेता जेव्हा राजकीय प्रवाहापासून अलिप्त होतो तेव्हा असे प्रभूनकोसे होतात. तेव्हा ही बाब या देशातील नैतिक मुल्यांचा आग्रह धरणा­यांसाठी चिंतेचीच आहे.

      ११ जुलै रोजी सुरेश प्रभू यांचा वाढदिवस संपन्न झाला. एक सजग नागरिक आणि सुरेश प्रभू यांचा अनेक वर्षांचा कार्यकर्ता म्हणून व्यक्त व्हावसं वाटलं, यासाठी हा लेखनप्रपंच.

अॅड.नकुल पार्सेकरसामाजिक कार्यकर्ता  (७७९८७१३४७५)

 

Leave a Reply

Close Menu