उत्सव रानभाज्यांचा 2023 : उत्स्फुर्त प्रतिसाद

      ‘माझा वेंगुर्ला’ ही संस्था नेहमीच नाविन्यपूर्ण, पर्यावरण, स्वच्छता पुरक उपक्रम राबवत असते. आपल्या जुन्या पिढींनी रानभाज्यांसारखे खूप सारे ज्ञान जोपासले. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे सध्याच्या काळात आवश्‍यक असल्याने आपल्या आहारात रानभाज्या असणे फार महत्त्वाचे आहे. अशाप्रकारे रानभाज्यांचा उत्सव भरवून माझा वेंगुर्ला जनजागृती करत आहे, याबाबत त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच! असे प्रतिपादन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले.

      माझा वेंगुर्ला या संस्थेमार्फत 30 जुलै रोजी ‘उत्सव रानभाज्यांचा‘ हा उपक्रम घेण्यात आला. सातत्याने सातव्या वर्षी  घेतलेल्या या उपक्रमात विविध प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच या रानभाज्यांपासून बनवण्यात आलेल्या पदार्थांच्या पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या. उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘माझा वेंगुर्ला’चे कार्याध्यक्ष संजय पुनाळेकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, राजा शृंगारे, नरेश गावडे, बाळा शिरसाट, राजेश गावडे यांच्यासह ‘माझा वेंगुर्ला’चे सर्व सदस्य उपस्थित होते. सर्वप्रथम सकाळी ‘माझा वेंगुर्ला’च्या सदस्यांनी निसर्गप्रेमींसह रानभाज्यांसाठी जंगल सफर केली. यामध्ये उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील प्रात्यक्षिक शिक्षण घेण्यासाठी दाभोली येथे आलेले शुभम घवाळी, तेजस काणेरकर, सौरभ सैद, चैतन्य गायकवाड, साईनाथ शिंदे, जोबिन सलीन हे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, डॉ. धनश्री पाटील व त्यांचे खर्डेकर महाविद्यालयातील विद्यार्थी, निसर्गप्रेमी नागरिक यांच्यासह रानभाजी तज्ज्ञ राजा शृंगारे, प्रकाश बांदवलकर यांच्या मदतीने जंगलात ट्रेकिंग करत या रानभाज्या एकत्रित केल्या व कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांचे प्रदर्शन लावले. शिवाय चित्रासहीत गुणवैशिष्ट्ये असलेले रानभाज्यांचे बॅनर लावण्यात आले होते. संजीवनी सेंद्रीय भाजीपाला उत्पादक समुह वेतोरा या बचतगटाने आपला स्टॉल लावून सहकार्य केले. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त आहारातील भरड धान्याचे महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी या धान्याच्या पाककृती संदर्भातील पुस्तक अनुवादित करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तकामध्ये या रानभाज्यांच्या पाककृतीचाही समावेश करून ते पुस्तक नगरपरिषदेतर्फे वितरीत करण्याचा मानस मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी यावेळी व्यक्त केला. प्रास्ताविकामध्ये संजय पुनाळेकर यांनी माझा वेेंगुर्ला ही संस्था नाविन्यपूर्ण उपक्रम घेणारी संस्था असून येथे होणाऱ्या उपक्रमांचे अनुकरण अन्यत्र होताना दिसते असे माझा वेेंगुर्लाचे वैशिष्ट्य सांगितले.

              ऋतुमानानुसार निसर्गात उपलब्ध फळे, भाज्या यांचे आपल्या आहारात योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीर सृदृढतेकडेच वाटचाल करते. औषध म्हणून एरंडेलाचे तेल पिताना भल्याभल्यांची अवस्था काय होते ते डॉक्टर म्हणून आम्ही अनुभवत असतो. पण या इथल्या सुगरणींनी बनवलेल्या इनोवेटीव एरंडेलाचे सरबत हे पाककलेचे कसब दाखवून देते. रानभाज्यांचे आहारातील अस्तित्व हे बीपी, शुगर, ॲनिमिया या आजारांना रोखायला मदत करते. असे परीक्षक म्हणून लाभलेल्या डॉक्टरांनी आपले विचार मांडले.

      यानिमित्ताने आयोजित केलेल्या रानभाज्यांच्या पाककृती स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत श्रेया अजित रेडकर (कंगुना भाजीचे वडे) यांनी प्रथम, स्मिता राजाराम नाईक (एरंडाचे सरबत) यांनी द्वितीय क्रमांक तर कु. पूर्वा जीवन परब (मिक्स रानभाजी कटलेट) हिने तृतीय क्रमांक पटकावले. तसेच रेखा पुरुषोत्तम नाईक (लाजरीची कढी), सुजाता गुरुराज साटम (आघाडा मोमोज), श्रावणी श्रीकृष्ण भोगटे (पेवग्याची वडी), महादेव लक्ष्मण मेस्त्री (पुनर्नवा भजी), सुप्रिया सुभाष हळदणकर (भरलेली करदूले), सुमित्रा महेश सामंत (निवडुंगाचे पातोळे) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. विजेत्या स्पर्धकांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण डॉ.अमोल दूधगावकर (कुडाळ), डॉ.सचिन पुराणिक (आरोंदा), डॉ.सुधीर निगुडकर (कसाल) यांनी केले. निवेदन शशांक मराठे यांनी केले. दरवर्षीप्रमाणे अमर दाभोलकर, नरेश गावडे, नरेेंद्र (बाळा) शिरसाट, संदेश सडवेलकर यांनी स्पर्र्धांसाठी प्रायोजकत्व स्वीकारले. तर आनंदी ठाकूर व डॉ. वसुधा मोरे यांनी या उपक्रमासाठी देणगी देऊन आर्थिक सहाय्य केले.

Leave a Reply

Close Menu