गणपतीचा पाट आणि मुर्तीची बदलेली संकल्पना

जवळजवळ सव्वीस वर्षानंतर यंदा मी गणेशोत्सव वेंगुर्ल्यात साजरा करणार आहे. नोकरी निमित्त मुंबईत स्थायिक होण्यासाठी मी वेंगुर्ला सोडले तेही गणेश चतुर्थीचे दिवसच होते. मला आठवते गणेश चतुर्थीचा चौथा दिवस होता आणि मी इकडची (महाराष्ट्र-गोवा बॉर्डर) एका मल्टीनॅशनल कंस्ट्रक्शन कंपनीतील नोकरी सोडून सरकारी नोकरी करण्यासाठी मुंबईला रवाना झालो होतो. तदनंतर दोन-तीन वर्षे मी गणपतीसाठी वेंगुर्ल्यात यायचो. अर्थात तोपर्यंत गणपतीची सर्व तयारी झालेली असायची. अगदी मी घरात पोहचेपर्यंत पूजा सुध्दा झालेली असायची. गणपतीमध्ये घरी पोहचेपर्यंत जीवाचे प्रचंड हाल होत असत, त्यामुळे मी घरच्यांची परवानगी घेऊन मुंबईत देखील गणपती आणायला सुरुवात केली. त्यामुळे एखाद-दुसरा दिवस सोडला तर माझे गणपतीसाठी वेंगुर्ल्यात येणे जवळजवळ बंद झाले, त्यामुळे इथे गणेशोत्सवात होत असलेल्या बदलांबाबत मला काहीच कल्पना नव्हती.

      गेल्यावर्षी ऑगस्टच्या अखेरीस अस्मादिकांची सिंधुदुर्गात पदोन्नतीने बदली झाली. परंतु नवी मुंबईत गणेशोत्सवाची सर्व तयारी झाली असल्याने फक्त दोन दिवस कार्यालयात हजर होऊन दीर्घ सुट्टी टाकून नवी मुंबईतल्या माझ्या घरी परतलो. गणेशोत्सव, जुन्या ऑफिसमधील निरोप समारंभ आणि घर शिफ्टींग ही अनेक कारणे होती. मुंबईकर गणेशोत्सवासाठी कोकणात येत होते आणि मी त्याच कारणासाठी मुंबईला जात होतो असा विचित्र योग आला होता. नवी मुंबईत कळंबोलीला माझे घर होते, त्याठिकाणी पेण वरून तयार मुर्त्या विक्रीसाठी ठेवल्या जातात. तेथे अशा गणपतीच्या शाळा सुरू झाल्या, की सर्वात आधी मी गणेश मुर्ती बुक करायला जायचो. सुरुवातीला काही वर्षे पीओपीची मुर्ती आणल्यावर पर्यावरणवाद्यांनी केलेल्या शाडू मातीच्या मुर्त्यांचा प्रसारमाध्यमातून केलेल्या आवाहनानंतर मी शाडूच्या मातीच्या मुर्त्यांकडे वळलो.

      शाडू मातीची गणेश मुर्ती मिळवताना बराच प्रयास करावा लागत होता. लोकांची मागणी पीओपी पासून बनविलेल्या मुर्र्तींची असल्याने अशा शाळेत क्वचीतच शाडू मातीच्या मुर्त्या मिळायच्या. माझा शाडू पासून बनविलेल्या मुर्तीचा आग्रह पाहून दरवर्षी अशा शाळांमध्ये माझ्या सारख्यांसाठी शाडू मातीच्या मुर्त्या विक्रीस ठेवल्या जावू लागल्या. मला दरवर्षी गणपतीच्या शाळा सुरू झाल्या की, ‘साहेब मुर्त्या आल्यात… बघायला या’ असा निरोप यायचा. शाडू मातीपेक्षा पीओपी पासून बनविलेल्या मुर्त्या अधिक आकर्षक असायच्या. विविध कृत्रिम अलंकार आणि वस्त्रांनी त्या लक्ष वेधून घ्यायच्या. मी मात्र पारंपरिक शाडू माती पासून बनविलेल्या मुर्त्यांचा आग्रह सोडला नाही.

      लहानपणी मी बराचकाळ गणपतीच्या शाळांमध्ये घालवलाय. शाळा सुटली की घरी दप्तर टाकून गणपतीच्या शाळेच्या दारात मुर्तीकार मुर्त्यांना देत असलेला आकार, रंगकाम निरखून पहायचो. बहुतांशी मुर्त्या हाताने बनविलेल्या असायच्यात, काही ठराविक मुर्त्या आयटीतल्या (म्हणजे तयार साच्यातल्या) असायच्या. हळूहळू धीर करून गणपतीच्या शाळेच्या आत प्रवेश करायचो, मुर्तीकाराला मुर्त्या घडवायला स्वखुषीने मदत करायचो. मदत म्हणजे नितळकाम, प्रायमर (पांढरा रंग) देणे अशी छोटी कामं करून माझा छंद जोपासायचो.

      त्यामुळे तळकोकणात फक्त शाडू माती पासून बनविलेल्या मुर्त्यांचेच पूजन होते असा माझा समज होता. नवी मुंबईतल्या माझ्या घरी गणेशोत्सव साजरा करताना तळकोकणातल्या गणेशोत्सवाच्या परंपरा जोपासायचा प्रयत्न करायचो. काही वर्षे माटी सुध्दा बांधली होती, पण माटीचे सामान सहजासहजी मिळत नसल्याने नेहमीच ते शक्य होई असेही नाही. शंकरासाठी उतरलेला नारळ उपलब्ध होत नसल्याने ती संकल्पना काही साध्य करता आली नव्हती. एकावर्षी पनवेल वरून एका मुर्तीकाराकडून हाताने बनविलेली शाडू मातीची मुर्ती बनवून घेतली. परंतु दुदैवाने पुढच्या वर्षी त्या मुर्तीकाराचे कोरोनामुळे दुख:द निधन झाल्याने पुन्हा तयार मुर्त्या विकत घ्याव्या लागल्या.

      गेल्या वर्षी नवी मुंबईत गौरी-गणपतीचा सण साजरा करुन मी वेंगुर्ल्यात घर शिफ्ट केले, आणि नियमित सिंधुदुर्गात नोकरीसाठी रुजू झालो. वेंगुर्ल्याहून आरोसला जाताना काळापाणी येथे एका ठिकाणी मला पीओपीच्या मुर्त्या दिसल्या. मी थोडासा आश्‍चर्यचकीत झालो, आपल्या इथे पीओपीच्या मुर्त्या कशासाठी? मित्राकडे चौकशी केली असता कळले की ‘रवले असतले’. मला अजूनही काही समजेना, मी पुढचा प्रश्‍न विचारला ‘हयसर पण पीओपीचे मुर्त्ये पुजतत?’ त्याने दिलेल्या हो या उत्तराने मी विचारात पडलो, समाज माध्यमात विसर्जनानंतरच्या तरंगत असलेल्या मुर्त्यांचा फोटो कुठेतरी पाहिल्याचे आठवले. पण काही पीओपीच्या मुर्त्यांचे प्रमाण फार कमी असेल अशी स्वत:च्याच मनाची समजूत घातली.

      जून महिना आला तसा मी मुर्तीकाराच्या शोधात होतो, अट एवढीच होती मुर्ती हाताने बनविलेली आणि शाडू मातीचीच हवी. शेवटी घराजवळच पूर्वीच्या कन्या शाळेत सुरू झालेल्या गणपतीच्या शाळेत हा शोध संपला. पाट आणि मला हवी असलेल्या गणपतीच्या मुर्तीचा फोटो दिल्यावर मुर्तीकाराशी गप्पा मारता मारता गणपतीच्या शाळेचे निरिक्षण चालूच होते. ‘आम्ही तुमका ओळाखतो, तुमचे लेख फेसबुकात, व्हाटसपार आणि किरातात वाचतो’. आता मला हे सवयीचे झाले आहे, वेंगुर्ल्यात कुणाकडे माझे काम असल्यास चर्चा करता करता हेच वाक्य बऱ्याच जणांकडून ऐकले होते. असो, जुलैच्या पहिल्या आठवड्यात मी गणपतीचा पाट द्यायला आलो असल्याने सर्व कामे सुशागात चालली होती. नागाच्या मोठ्या मोठ्या मुर्त्या बनविल्या जात होत्या. गेली अनेक वर्षे पनवेलात मिळणाऱ्या बोटा एवढ्या नागाच्या मुर्त्या पहायची सवय झाल्याने मी अचंबित होऊन विचारले, ‘येदे मोठे नागोबा कोणासाठी?’ ‘गोव्यातसून ऑडरी आसत’ मुर्तीकार मुर्तीला आकार देता देता उत्तरला. मग मीही त्याच्याकडे मोठा नाही पण मध्यम आकाराची नागोबाची आणि कृष्णाच्या मुर्तीची ऑर्डर दिली. गोकुळाष्टमीमध्ये श्रीकृष्णाची मातीची मुर्ती पूजन करण्याची परंपरा ही फक्त आपल्याकडेच आहे.

      गणपतीच्या शाळा नुकतीच सुरू झाली असल्याने अजून कुणाचे पाट आले नव्हते. ‘लोका नागपंचमी किंवा संकष्टी झाल्याशिवाय पाट दिनत नाय. मगे सगळी घाय होता’. मुर्तीकार बोलतच होता, माझे मात्र तिथे असलेल्या पीओपी पासून बनलेल्या गणेश मुर्त्यांकडे लक्ष जात होते. मी काही विचारायच्या आत मुर्तीकार बोलला, ‘भारयरसून आणलेत… अजून बरेच येवचे आसत’. मला वाटल शाळेत असलेल्या चार-पाच मुर्त्या एवढेच प्रमाण असेल, पण त्याने अजून येणार आहेत असे बोलल्यावर मी अधिक चौकशी केली. चौकशीत कळाले की, वजनाने हलक्या व स्वस्त असल्याने आता इथे पीओपी पासून बनविलेल्या मुर्त्यांचे प्रमाण वाढले आहे. ‘गोर्व्हमेंटान सुध्दा आता परमिशन दिली हा…’ त्याच्या या वाक्यावर माझ्याकडे अजून काही बोलण्यासारखे राहिलेच नव्हते.

      अलीकडे कोकणात येणाऱ्या एका प्रकल्पाने कोकणातील पर्यावरणाचा ऱ्हास होईल म्हणून केवढे रान उठले होते. काही युट्यूबर तर या प्रकल्पा विरोधात व्हिडीओ बनवून बनवून सुपरस्टार बनले. दरवर्षी मुंबईत पर्यावरणवादी पीओपी च्या मुर्त्या पर्यावरणासाठी कशा घातक आहेत हे ओरडून ओरडून सांगत आहेत, विसर्जनानंतर मुर्त्यांची होणारी विटंबना पहावत नाही. तरीही इथे जागृकता कशी नाही याचे मला आश्‍चर्य वाटले. कोकणात निसर्गाचे देणे खुप मोठे आहे, त्यामुळे पीओपीच्या मुर्त्यांमुळे इथे हानी होणार नाही अशी मखलाशी मी अलिकडेच म्हणजेच सरकारने यावर्षीही पीओपीच्या मुर्त्यांवर बंदी घातली नाही ही बातमी वाचताना एका मुर्तीकाराने केलेली वाचली आहे.

      अजून तरी कोकणात पीओपीच्या मुर्त्यांचे प्रमाण किती आहे याची मला कल्पना नाही. परंतु बऱ्याच शाळांमध्ये पीओपीच्या मुर्त्या मोठ्या प्रमाणात बाहेरून मागविल्या जात आहेत, आणि भरभरून येणारे ट्रक दृष्टीस पडत आहेत. कोकणात विशेषत: खेड्यात मोठ्या मुर्त्या घरापर्यंत नेताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते पण त्याला पीओपीच्या मुर्त्या हा शेवटचा पर्याय नक्कीच ठरत नाही.

      जाता-जाता आठवले म्हणून लिहितो, मी नवी मुंबईत जेंव्हा पहिल्यांदा शाडू मातीपासून मिळणाऱ्या मुर्तीच्या शोधात होतो तेंव्हा मला एका दुकानात शाडू माती पासून बनलेली मुर्ती दिसली. लागलीच मी बुक करायला गेलो तर, ‘साहेब ही एकच शाडू मातीपासून बनलेली मुर्ती माझ्याकडे आहे, मी तुमच्यासाठी दुसरी मागवतो’. दुकानदाराने बोललेले पुढचे वाक्य माझ्या स्मरणात अजून जशाचे तसे आहे. ‘साहेब इथल्या एका मुस्लीम भाविकाची दरवर्षीची ऑर्डर आहे ही. गणपतीची मुर्ती पुजायची ती फक्त शाडू मातीची, असा त्याचा आग्रह असतो’. मी अचंबित होऊन त्याला माझ्यासाठीही शाडू मातीची मुर्ती आण अशी ऑर्डर देऊन घरी परतलो होतो. दहा-बारा वर्षापूर्वीची गोष्ट असेल ही, हिन्दू धर्मात असलेले शास्त्र अजूनही आपल्याला समजलेले नाही याचे वाईट वाटते.                                                                                                                               – संजय गोविंद घोगळे, 8655178247

Leave a Reply

Close Menu