दशावतारातून होणारे समाजप्रबोधन गौरवास्पद

दत्तमाऊली पारंपरिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुद्देशीय मंडळ सिंधुदुर्ग यांच्या ‘‘प्रवास दत्तमाऊलीचा, सोहळा त्रै वर्ष पूर्तीचा‘‘ या अंतर्गत २० जुलै रोजी पुरस्कार वितरण, बक्षिस वितरण व विविध सन्मान कार्यक्रम मठ येथील स्वयंभू मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी आमदार वैभव नाईक, मठ सरपंच रुपाली नाईक, ग्रा.पं.सदस्य नित्यानंद शेणई, जेष्ठ दशावतार कलाकार महेश गवंडे, उद्योजक दीपक ठाकूर, अॅड. सोनू गवस, सरपंच संघटना अध्यक्ष प्रेमानंद देसाई, अॅड.पी.डी.देसाई, लेखापरीक्षक राकेश धर्णे, मंडळाचे हितचिंतक राजन बोवलेकर, दोडामार्ग दशावतार कलाकार संघटना अध्यक्ष सुभाष लोंढे, खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचे चालक मालक बाबा मेस्त्री, ‘झी २४ तास‘चे राजा दळवी, दयानंद शेणई, कुडाळ सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे, कुडाळचे माजी पं.स.सभापती संजय वेंगुर्लेकर, आंदूर्ले सरपंच अक्षय तेंडोलकर आदी उपस्थित होते.

    सोशल मिडियाच्या माध्यमातून दशावतार कला सातासमुद्रापार गेली आहे. दत्तमाऊली दशावतार मंडळ हे दशावताराच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करत आहेत हे गौरवास्पद आहे. दशावतारी कलाकारांना सन्मान मिळवून देण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले. या कार्यक्रमात मंडळाकडून दिला जाणारा विशेष ‘दत्तमाऊली दशावतार कला तपस्वी पुरस्कार २०२३‘ ज्येष्ठ दशावतार कलाकार यशवंत रघुनाथ तेंडोलकर (तेंडोली) यांना देऊन गौरविण्यात आले. साक्षात वैकुंठीच्या नारायणाने या पुरस्काराचे नामकरण करून हे नामकरण आपले वाहन गरुडाकरवी व्यासपिठावर पाठवले असा देखावा साकरण्यात आला होता. यानंतर आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते तेंडोलकर यांचा त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत सन्मानपत्र, भव्य दशावतार सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. तर निवृत्त शिक्षिका माधवी यशवंत मठकर यांचाही विशेष सन्मान केला.

         पाट येथील स.का.पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी पुराच्या पाण्यात वाहून जात असताना तिला वाचवणा­या आंदूर्ले येथील जयेश कोनकर, निवती येथील जितेश भगत यांचाही शौर्य पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव दत्तप्रसाद शेणई यांनी संस्थेच्या वाटचालीबाबत माहिती देताना या प्रवासात सहकार्य केलेल्या सर्व दात्यांचे आभार मानले व नाट्यरसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मंडळाचे पहिल्या वर्षी १२०, दुस­या वर्षी २३५ व तिस­या वर्षी तब्बल २७० नाट्यप्रयोग सादर केल्याचेही सांगितले. तर अध्यक्ष बाबा मयेकर यांनी आपली संस्था ही नाट्य प्रयोगातून समाज प्रबोधनाचे काम करत असून या माध्यमातून अजून गरुड भरारी घ्यायची असल्याचे त्यांनी नमूद केले. निवेदन श्री.नेवगी यांनी केले.

Leave a Reply

Close Menu