नागोबाकडे भरला जातो ओवसा!

वेतोरे-सबनीसवाडी येथील गावडे कुटुंबियांसह दापटीवाडी येथील मुळीक, आरावंदेकर कुटुंबिय व आसोली, जोसोली, वडखोल व होडावडे या गावात नागपंचमीच्या दिवशी नागोबाकडे ओवसा ओवासण्याची आगळी वेगळी प्रथा जोपासत आहेत. यावर्षीही हा कार्यक्रम महिलांनी उत्साहात पार पाडला.

    नागपंचमी दिवशी कुटुंबातील जाणत्या व्यक्तीने नागोबाची पूजा झाल्यानंतर कुटुंबातील सर्व स्त्रिया व नववधू नागोबाकडे एका सुपात काकडी, करांदा, हळद, दोडके व सफेद चाफा अशा पाच प्रकारची पाने घेऊन त्यावर काकडी, सफरचंद, लाह्या, पोहे, केळी यासह अन्य चिरलेली फळे ठेऊन ओवसा भरला जातो. सुपात भरलेला ओवसा लोकरीच्या कापडाने, रुमालाने  झाकून ठेवले जातात व त्यानंतर सार्वजनिक गा-­हाणे घालून सर्व स्त्रिया आपापल्या सुपाला हळदकुंकू वाहून ओवसा मानवला जातो. नववधूचा ओवसा हा दोन सुपे, एक सुपली, डाळी व परडी अशा पाच भांड्यात भरला जातो. नंतर तुळशीकडे ग्रामदेवता, कुलदेवतेला ओवसा ठेऊन कुटुंबातील सर्व सदस्यांना ओवशातले पान वाण म्हणून देतात. ओवसा हा प्रकार प्रत्येक नविन लग्न झालेल्या सुनेसाठी फारच महत्त्वाचा मानला जातो. शिवाय सूप घरातील सुबत्तेचं लक्षण मानले जाते. भरलेलं सूप देणे हे ऐश्वर्याचे व मांगल्याचे प्रतिक आहे. यानिमित्ताने ही सुपे वाटताना घरात आालेल्या नव्या सुनेला तिच्या घरातील थोरामोठ्यांची ओळख करून दिली जाते.

Leave a Reply

Close Menu