स्वच्छतेचा वेंगुर्ला पॅटर्न गोव्यात राबविणार-उल्हास तुयेकर

कचरा ही एखाद्या शहराला भेडसावणारी समस्या असते. वेंगुर्ला शहराचा कचरा डेपोला भेट दिल्यावर कचरा ही समस्या नसून उत्पन्न मिळविण्याचे स्त्रोत असल्याचे निदर्शनास येते. अशा कचरा डेपोमध्ये येणारे मान्यवर जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. वेंगुर्ल्याप्रमाणेच गोव्यामध्ये असा प्रकल्प उभारण्यासाठी मार्गदर्शन घेऊन प्रयत्न करणार असल्याचे मत गोवा विधानसभा आमदार तथा कदंबा परिवहन महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी मांडले.

      राष्ट्रीय स्तरावर अव्वल मानांकन मिळविलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेचे प्रकल्प पाहण्यासाठी गोवा विधानसभा आमदार तथा कदंबा परिवहन महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर, दिवली नावेली गावचे सरपंच संतोष नाईक, उपसरपंच सायमन कार्वालो, ग्रामपंचायत सदस्य साईश राजाध्यक्ष, विद्याधर आर्लेकर, मिशल मीरांडा, संपदा नाईक, व्ही.डी.सी.चे चेअरमन जयानंद देसाई, मेंबर दिनेश माने, रवी अमरापुरकर, नारायण कांबळी आदींनी ५ डिसेंबर रोजी वेंगुर्ला येथे भेट दिली. मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सर्वांचे स्वागत करून नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात स्वच्छता संकल्पनेवर आधारित चित्रफिती, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नाविन्यपूर्ण विकास कामे यांची माहिती दिली. त्यानंतर उपस्थितांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी व मैलापाणी व्यवस्थापन प्रकल्प यांची पाहणी केली. वेस्ट टू बेस्ट या संकल्पनेनुसार विकसित केलेल्या मिरॅकल पार्क व यमादोरी गार्डन तसेच कलादालन यांना भेट दिली. झिरो वेस्ट संकल्पेनुसार पर्यावरण पुरक पत्रावळ्या, द्रोण व ग्लास यातून मान्यवरांना कंपोस्ट डेपो येथे स्नेहभोजन देण्यात आले. विविध प्रकल्प पाहून गोवा येथील या मान्यवरांनी वेंगुर्ला नगरपरिषदेचे कौतुक केले.

      वेंगुर्लावासीय व नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचा-यांकडून स्वच्छतेप्रती देण्यात येणा-या अमूल्य योगदानामुळे वेंगुर्ला शहराला नावलौकिक प्राप्त झाला असल्याचे मुख्याधिकारी कंकाळ यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, नगरपरिषदेचे स्वच्छता ब्रॅण्ड अॅम्बेसिडर सुनिल नांदोस्कर व नगरपरिषदेचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu