लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, धनादेश, गॅस शेगडी वितरण

भारत सरकारच्या प्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत विहित वेळेत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचे ३० डिसेंबर रोजी वेंगुर्ला येथे आगमन झाल्यानंतर नगरपरिषदेच्यावतीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी विविध योजनांची माहिती व लाभ देणारे स्टॉल उभारले होते तसेच आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आले. याला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

      कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते झाला. यावेळी पोलिस निरीक्षक अतुल जाधव, आरोग्य अधिकारी डॉ.सुप्रिया रावळ, बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापक राजेंद्र वेळकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रविद्र पत्की, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर, सुषमा प्रभूखानोलकर, पत्रकार व विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.

      या कार्यक्रमात केंद्र शासनाच्या पी.एम.स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत विविध लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, धनादेश, गॅस शेगडी आदींचे वितरण करण्यात आले. सुत्रसंचालन वैभव म्हाकवेकर यांनी केले.

Leave a Reply

Close Menu