वेंगुर्ला व शिरोडा बसस्थानकांची स्वच्छता कमिटीकडून तपासणी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून राज्यातील ३१ जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाची आगारे व बसस्थानके यांची तपासणी व्हावी, प्रवाशांना सेवा व सुविधा मिळतात की नाही, याबरोबर आगार व बसस्थानकांत गाड्यासह परिसराची स्वच्छता रहाते की नाही, याची दरवर्षी पहाणी व्हावी व त्यादृष्टीने प्रवाशांना सोयी सुविधा कमतरता असलेल्या भागात त्या देण्याच्या उद्देशाने राज्यपरिवहन महामंडळामार्फत हिंदुहृदय सम्राटबाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धात्मक स्वरूपात राबविण्यात येत आहे. या स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धेत सहभागी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८ बस स्थानकांची तपासणी या सांगली विभागाच्या समिती मार्फत सुरू आहे. ९ जानेवारी रोजी वेंगुर्ला बस स्थानक व शिरोडा बस स्थानक या वेंगुर्ला आगाराच्या बस स्थानकांचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या सांगली विभागाच्या सर्वेक्षण समितीचे प्रमुख सांगली विभाग नियंत्रक सुनील भोकरे, विभागीय अभियंता सुशांत पाटील, सांख्यिकी अधिकारी अनिल पार्टे, कामगार अधिकारी प्रविण पाटील यांचे वेंगुर्ला बस स्थानकावर आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत प्रवासी संघटना प्रतिनिधी राधाकृष्ण वेतुरकर, या समितीचे प्रतिनीधी पत्रकार भरत सातोस्कर, प्रवासी प्रतिनिधी प्रा.वैभव खानोलकर आदी उपस्थित होते.

   या स्पर्धेत वर्षभरात वेंगुर्ला व शिरोडा बस स्थानकातील परिसर, बसेस, वेंगुर्ला आगार परिसर, बस स्थानक स्वच्छतेबरोबरच पर्यावरण पूरक वसुंधरे बाबत केलेले काम, प्रवाशांसाठी केलेल्या सेवा सुविधा तसेच अन्य बाबी यांची पाहणी या समितीने प्रत्यक्ष विविध जागेवर जात केली.

 

Leave a Reply

Close Menu