अलिबाग, रायगड येथे १ ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोकण विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वेंगुर्ल्याचे तहसीलदार ओंकार ओतारी यांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी रायगडचे खासदार सुनील तटकरे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि अन्य
उपस्थित होते. तहसीलदार ओंकार ओतारी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असून हा पुरस्कार केवळ माझा नसून अनेकांच्या विश्वास, मार्गदर्शन, सहकार्य आणि प्रेरणेचे फलित आहे. या यशामागे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन, सर्व वरिष्ठ महसूल अधिकारी यांचे नेतृत्व तसेच माझ्या सर्व सहकारी अधिकारी व कर्मचारी यांचे सातत्यपूर्ण सहकार्य आणि टीमवर्क यांचा मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक सुख-दुःखात माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून मला सतत प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या कुटुंबीयांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या प्रेम, विश्वास, त्याग आणि पाठिंब्याशिवाय हा सन्मान प्राप्त करणे शक्य झाले नसते. या यशात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. भविष्यातही अधिक जबाबदारीने, प्रामाणिकपणे आणि लोकाभिमुख सेवाभावाने कार्य करत राहण्याचा मी निर्धार व्यक्त करतो, असेही त्यांनी सांगितले. तहसीलदार ओतारी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
