आजी-माजी शिक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका स्कूल वेंगुर्ला शाळा नं.१च्या माजी विद्यार्थ्यांनी २९ जुलै रोजी गुरूपौर्णिमा साजरी करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी व्यासपिठावर निवृत्त केंद्रप्रमुख वि.म.पेडणेकर, शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक आबा खोत, राजेंद्र बेहरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा शाळेचे माजी विद्यार्थी अभिषेक वेंगुर्लेकर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, काही वर्षांपूर्वी तालुकास्कूलमध्ये ज्ञानदानाचे कार्य केलेले शिक्षक संतोष परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवर शिक्षकांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाले. त्यानंतर दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिक्षण घेत असताना अद्ययावत ज्ञान आत्मसात करा. गुरूंनी दिलेल्या मुल्यांची जोपासना करा. आई-वडील आणि गुरूजनांचा आदर करा आणि शिक्षणासोबत आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करा. अंधारातून प्रकाशाकडे नेणारे गुरूच असतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने गुरूंच्या मार्गदर्शनाचे पालन करावे. तसेच आजच्या काळात मोबाईलचा आवश्यक तेवढाच वापर करून त्याचा अयोग्य वापर टाळावा असे आवाहन निवृत्त केंद्रप्रमुख वि.म.पेडणेकर यांनी केले.
गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून सेवानिवृत्त शिक्षक वि.म.पेडणेकर, आबा खोत, राजेंद्र बेहरे तसेच सध्या कार्यरत असलेले मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, शिक्षक प्रशांत मांडे, लिना नाईक, अनुश्री कुशे, वंदना शितोळे, प्रगती आव्हाड, संतोष परब यांचा माजी विद्यार्थ्यांनी शाल, श्रीफळ आणि वृक्ष देऊन सन्मान केला. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेतील जुन्या आठवणींना उजाळाही दिला.
या कार्यक्रमाला पोलीस दलात कार्यरत असलेले राहूल वेंगुर्लेकर यांच्यासह प्रथमेश यंदे, निखिल घोटगे, आस्वाद पोतनीस, जयेश गावडे, योगेश यादव, स्वप्निल पांडजी, सुरज साळगांवकर, प्रमोद वेर्णेकर, चेतन ठोंबरे, सुहास मांजरेकर, सौरभ माळवदे, बुशरा शेख, स्वरूपा सौदागर, अॅड.सुधा केळजी, हेमांगी शिरगांवकर, योगराज यादव आणि प्रथमेश गुरव आदी माजी विद्यार्थी तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या इंद्रायणी पडवळ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा माजी विद्यार्थी अभिषेक वेंगुर्लेकर यांनी मानले.
