वेंगुर्ला न.प.ची मासिक सभा नुकतीच नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी आणि सर्व खात्यांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. पालिकेवर आता लोकनियुक्त प्रतिनिधींची सत्ता आहे, याचे भान प्रशासनाने ठेवावे. कौन्सिल सभेत जे विषय मांडले जातात ते जनतेशी निगडीत असतात. त्यामुळे सभेत होणाऱ्या ठरावांबाबत प्रशासनाने गंभीर असायला हवे, असा स्पष्ट इशारा नगरसेवकांनी प्रशासनाला दिला. शहरात वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत मानसी गार्डन ते मांडवी खाडीपर्यंत सायकलिंग ट्रॅक उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाकडून मंजूरी मिळाली होती. यासाठी साडेआठ कोटीचा निधीही मंजूर होता. मांडवीखाडीलगत मोठ्या प्रमाणावर खारफुटी असल्यामुळे सीआरझेडच्या नियमांची मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण ठराव या सभेत घेण्यात आला. या योजनेसाठी यापूर्वी प्राप्त झालेला कोटीचा निधी शासनाला समर्पित करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. शहरात भुयारी गटार नसल्याने स्वच्छता अभियानात मुल्यांकनावर परिणाम होत आहे. सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भूयारी गटार योजनेला चालना देणे गरजेचे असल्याचे नगराध्यक्ष गिरप यांनी स्पष्ट केले. या योजनेसाठी काही निधी मंजूर आहे. तिला चालना देण्यासाठी सर्वप्रथम एसटीपी टँकसाठी जागा उपलब्ध करणे गरजेचे आहे. शहराच्या रचनेनुसार विविध किमान पाच ठिकाणी असे टँक उभारणे आवश्यक असून त्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू करावेत. यासाठी म्हाडा वसाहत, रेडकर खाणावळीच्या बाजूला, आंबेखण, दाभोसवाडा विठ्ठल मंदिर जवळ आणि कलानगर गुणवंत मांजरेकर यांच्या घराच्या पाठीमागील भागात जमीन उपलब्ध करावी, असा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला.
हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या योजनेंतर्गत प्राप्त ५० लाखाच्या निधीतून मांडवी रस्त्यावर खाऊगल्ली उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र, हा निधी महिलांसाठी आरोग्यविषयक सुविधा निर्माण करण्यासाठी वापरावा आणि सिंधुरत्न योजनेमधून खाऊगल्लीचे काम करावे, असा ठराव घेण्यात आला.
वेंगुर्ला शहरात गेल्या पाच ते सहा वर्षापासून गॅस पाईपलाईनचे काम कोलमडलेल्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी ते पूर्ण झाले, तर काही ठिकाणी अजून पाईपलाईन टाकण्याचे कामही पूर्ण झाले नाही. त्यामुळे संबंधित एजन्सिला सूचना देऊन या कामाला गती द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली.
