कार्यशाळेत ५०० हून अधिक सीडबॉल्सची निर्मिती

  जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणाचा कृतीशील संदेश देण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने ‘स्वच्छ भारत पर्यटन स्थळ’ येथे विशेष ‘सीडबॉल  कार्यशाळा’ घेण्यात आली. या कार्यशाळेला नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रणव
वायंगणकर, गौरी माईणकर, गौरी मराठे,  रिया केरकर, सचिन शेटये, लीना म्हापणकर, आकांक्षा परब, सुषमा प्रभुखानोलकर, विनय नेरुरकर, काजल कुबल, सुमन संदेश निकम, शितल आंगचेकर आणि
नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. या सर्वांनी  मिळून सुमारे ५०० हून अधिक सीडबॉल्स तयार केले. माती, शेणखत आणि देशी वृक्षांच्या (वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, कोकम इ.) बियाण्यांचे योग्य मिश्रण करून हे बीजगोळे बनविण्यात आले आहेत.
तयार करण्यात आलेले हे ५०० सीडबॉल्स पावसाळ्याच्या सुरुवातीला शहराच्या ओसाड भागात आणि मोकळ्या वनक्षेत्रात टाकले जातील. सीडबॉलमधील माती आणि खताचे कवच बियांचे पक्षी व मुंग्यांपासून रक्षण करते आणि पावसाच्या पहिल्या सरी मिळताच या बिया नैसर्गिकरित्या रुजण्यास मदत होते.
“सीडबॉल तंत्रज्ञान ही निसर्गाची पुनर्रचना करण्याची एक सोपी पण अत्यंत प्रभावी पद्धत आहे. आजच्या या उपक्रमाने केवळ ५०० बियांची पेरणी झाली नसून, तर भविष्यातील ५०० वृक्षांची पायाभरणी झाली आहे. वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहराचा हरित पट्टा वाढवणे हाच आमचा मुख्य मानस आहे.” असे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले.

Leave a Reply