मठ ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीत दर्शना नाईक विजयी

वेंगुर्ला तालुक्यातील मठ, परूळेबाजार, चिपी व मेढा या चार ग्रा.पं.च्या रिक्त पाच जागांकरीता सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी पोटनिवडणुक कार्यक्रमांतर्गत निवडणुक कार्यक्रम जाहीर केला होता. या निवडणुक कार्यक्रमानुसार एकमेव मठ ग्रा.पं.च्या प्रभाग क्र.3 सर्वसाधारण स्त्री या जागेसाठी उभे असलेले उमेदवार सुप्रिया सुशांत गावडे व दर्शना दिनेश नाईक यांच्या निवडीसाठी 29 एप्रिल रोजी मतदान पार पडले. एकूण 725 मतदारांपैकी 444 मतदारांनी (स्त्री 230 आणि पुरूष 214) मतदानाचा हक्क बजाविला. मतमोजणीत गाव विकास पॅनलच्या दर्शना नाईक यांना 236 तर भाजपाच्या सुप्रिया गावडे यांना 197 मते मिळाली. यात दर्शना नाईक विजयी झाल्या. निकाल जाहीर होताच जि.प.सदस्य संजय गावडे, माजी उपसरपंच नित्यानंद शेणई, ग्रा.पं.सदस्य महेश सावंत, अरविंद बागायतकर, स्वप्निल गडेकर, समीर नाईक, सौ.नाईक यांनी दर्शना नाईक यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, या पोटनिवडणुकीत मठ ग्रा.पं.च्या प्रभाग क्र. 2 मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग या रिक्त जागेसाठी कविता आशिष घोलेकर व पूनम नरेश बोवलेकर असे दोन अर्ज आले होते. यातील पूनम नरेश बोवलेकर यांचा अर्ज छाननीत अवैध ठरल्याने प्रतिस्पर्धी उमेदवार कविता आशिष घोलेकर यांची बिनविरोध निवड झाली. चिपी ग्रा.पं.च्या प्रभाग क्र.3 चे उमेदवार संदेश चंद्रकांत करंगुटकर यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध  ठरले. परूळेबाजार ग्रा.पं.च्या प्रभाग क्र.3साठी उमेदवारी अर्ज भरलेल्या अपेक्षा अंकुश हादगे या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रतिस्पर्धी उमेदवार रश्मी सामंत यांची बिनविरोध निवड झाली आहे आणि मेढा ग्रा.पं.च्या प्रभाग क्र. 2 मधील सर्वसाधारण या पदासाठी एकही उमेदवारी अर्ज न आल्याने ते पद रिक्तच राहिले आहे.

Leave a Reply