ब्रिटिशकाळापासून वेंगुर्ला शहरातील गवळीवाडा येथे राहणाऱ्या रहिवाशांच्या नावे ते राहत असलेली हक्काची जमीन नव्हती. गेली ४० वर्षे यासाठी राहिवाशांचा लढा सुरू होता. तो प्रश्न आता संपुष्टात आला असून नुकत्याच वेंगुर्ला येथे संपन्न झालेल्या समाधान शिबिरात येथील सुमारे ४१ कुटुंबांपैकी १७ कुटुंबांना ताबा पावतीचे वाटप आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शहरातील कातकरी समाजाला त्यांच्या नावे जमिनीचा सातबारा वितरण करण्यात आले. न.प.मार्फत त्यांना घरे ही बांधून देण्यात येणार आहेत.वेंगुर्ला तहसील कार्यालय येथे ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबीर आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन आमदार केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यावेळी प्रांताधिकारी शारदा पोवार, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, तहसीलदार ओंकार ओतरी, नगराध्यक्ष दिलीप गिरप, जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, जि.प.सदस्य संजय गावडे, मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, सार्वजनिक बांधकाम सहा. कार्यकारी अभियंता आश्लेष शिंदे, उपसभापती सचिन देसाई, सचिन वालावलकर, नगरसेवक गौरी मराठे, रिया केरकर, अश्विनी माईणकर, शीतल आंगचेकर, दाजी परब, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, अजित राऊळ, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, मठ सरपंच रुपाली नाईक आदी उपस्थित होते.
गवळीवाडा येथील सुमारे ४१ घरांच्या राहत्या जमिनी त्याठिकाणच्या राहिवाशांच्या नावे नव्हत्या. ते त्याठिकाणचे रहिवासी आहेत याचे कोणतेही पुरावे नव्हते. याबाबत गेली ४० वर्षे रहिवासी संघर्ष करत होते. या विषयात शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी लक्ष घालून आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून रहिवासी राहत असलेल्या जमिनी नावावर करण्यासाठी पाठपुरावा केला. आता रहिवाशांचा जमिनींचा प्रश्न संपुष्टात असून यातील १७ घरांना ताबा पावतीचे वाटप करण्यात आले. उर्वरित घराची प्रक्रिया सुरू आहे. गवळीवाडा असा सातबारा वेगळा करण्यात येणार आहे. यानंतर सर्व्हे नंबर ४९१ मधून प्रत्येकाचे सातबारा वेगळे होणार आहे. याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री नितेश राणे व यासाठी विशेष प्रयत्न करणारे आमदार दीपक केसरकर व यासाठी पाठपुरावा करणारे सचिन वालावलकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, तत्कालीन प्रांताधिकारी निकम, तहसीलदार ओंकार ओतरी यांचे रहिवाशांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. तसेच गवळीवाडा रहिवाशांच्यावतीने आमदार दीपक केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कातकरी समाजाला जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी घरासाठी जमीन दिली होती. प्रत्येक कुटुंबाच्या नावे ५० स्क्वेअर मीटर जागा देण्यात आली होती. त्यांना या शिबिरात सातबारा, उत्पन्नाचा दाखला देण्यात आला. यानंतर नगरपरिषदेच्यावतीने कातकरी समाजाला घरे बांधून देण्यात येणार आहेत.
