कुडाळ येथील प्रतिथयश व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजचा शैक्षणिक वर्ष 2025-26 चा वार्षिक पदवीदान आणि पारितोषिक वितरण समारंभ नुकताच महाराष्ट्र राज्याचे माहिती व तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, विधानसभा सदस्य निलेश राणे, फर्ग्यूसन लॉ कॉलेज, पुणेच्या प्राचार्या डॉ. सुनीता आढाव आणि गोवा येथील नगरसेवक डॉ. तारक आरोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यात कायद्याचे शिक्षण पूर्ण केलेल्या ५ वर्षांच्या (B.A . LL.B.) आणि ३ वर्षांच्या (LL.B.) अशा दोन्ही बॅचच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.कॉलेजच्यावतीने कॉलेजचे संस्थापक व्हिक्टर डांटस यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला. प्राचार्या डॉ. शिल्पा मर्गज यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या वार्षिक प्रगतीचा अहवाल मांडला. यानंतर लॉ कॉलेजच्या वार्षिक अहवाल 2025-26 चे अनावरण तसेच लॉ कॉलेजच्या होरायझन या लॉ मॅगेझिन च्या 8 व्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
याच कार्यक्रमात मेडिएशन आणि मूट कोर्ट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्हे आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये के.सी.कॉलेज मुंबईच्या स्पर्धेतील लॉ कॉलेज कुडाळची मेडिशन स्पर्धेची विजेती टीम श्रेया मयेकर, रोझन खान, लियोन पिंटो
तसेच लेटर टु चीफ जस्टिस स्पर्धेची विजेती टीम हिताक्षी तारी व ध्रुवा नेमळेकर यांना तसेच शिवाजी विद्यापीठ लॉ विभागाच्या मूट स्पर्धेतील लॉ कॉलेज कुडाळचे विजेते प्रतिक सावंत, महिमा माने, भक्ती खटावकर तर बेस्ट मूटर म्हणून महिमा माने आणि मेडीयशन स्पर्धेतील विजेते श्रेया मयेकर, लियोन पिंटो, आदित्य डांगी, श्रीशा सुर्वे, रोझन खान यांचा समावेश होता. लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी अॅड. उजा आईर यांचा कातकरी समाजाच्या उत्थानासाठी वेताळ बांबर्डे येथे ‘शोषित मुक्ती अभियान संस्था’ आणि ‘नाग्या महादू निवासी वसतिगृह’ स्थापन करून केलेल्या समाजकार्याचा गौरव करण्यात आला. पुणे, मुंबई तसेच इतर शहरी भागात असणाऱ्या कायद्याचे अद्ययावत शिक्षण देणाऱ्या मोठ्या कॉलेजेसशी बरोबरी करू शकेल असे अद्ययावत शिक्षण देणारे सुसज्ज कॉलेज कुडाळसारख्या ठिकाणी स्थापन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे कायद्याचे अद्ययावत शिक्षण घेण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी खुप मोलाचा हातभार लावला आहे. या कॉलेजमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासामध्ये निश्चितच मोलाची भर पडलेली आहे असे गौरवोद्गार अॅड. आशिष शेलार यांनी काढले. याप्रसंगी
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, काका कुडाळकर, संजय पडते आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी लॉ कॉलेजची प्रशस्त इमारत, वातानुकुलीत सुसज्ज ग्रंथालय, वातानुकुलीत अद्ययावत ई-ग्रंथालय, वातानुकुलीत सुसज्ज मुट कोर्ट हॉल, अंतर्गत ऑडिटोरीयम आणि इतर शैक्षणिक सोयीसुविधांचे विशेष कौतुक केले. सूत्रसंचालन अमेय जोशी, रोझन खान, ध्रुवा नेमळेकर, आफरीन शेख, आदित्य डांगी व एलविना फर्नांडिस यांनी केले. तर व्हिक्टर डांटस यांनी आभार मानले.
