भीमपर्व उत्सव समितीतर्फे बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेव आंबेडकर यांची १३५ वी जयंती १४ एप्रिल रोजी नगर वाचनालय सभागृह येथे साजरी करण्यात आली. उदघाटन फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनिल जाधव, आंबेडकरी चळवळीचे निष्ठावान कार्यकर्ते दत्ताराम जाधव, भीमपर्व उत्सव समिती -२०२६ चे अध्यक्ष प्रथमेश मठकर, संघटक राघोजी जाधव, बौध्द महासभेचे सुंदर म्हापणकर, अपरांत साहित्य कला प्रबोधिनी वेंगुर्लाचे अध्यक्ष महेंद्र मातोंडकर, उपाध्यक्ष अंकुश तेंडोलकर, शंकर खानोलकर, न्हानू मठकर, अशोक सावळे, दिपाली कोचरेकर, संचिता जाधव, साक्षी खानोलकर, राखी कोचरेकर, वैशाली वराडकर आदी उपस्थित होते. डॉ. आंबेडकर यांचे विचार आपल्यासाठी ऊर्जा आहे. त्यांनी आपल्याला संघटित होऊन समाजाचा उत्कर्ष करण्याची शिकवण दिली आहे. आंबेडकरी चळवळही समाज सुदृढ करणारी विचारधारा असून आपण ती गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे अंमलात आणत आहोत. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांना आत्मसात करुन वेंगुर्ल्यात आपण सर्व संघटनांना एकत्रित घेत चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षात अनेक उपक्रम राबवून समाजात चैतन्य निर्माण करु, असे आवाहन जयप्रकाश चमणकर यांनी केले.
दत्ताराम जाधव यांनी आज डॉ.आंबेडकर यांच्या विचारांना संपविण्याचा कट आणि प्रयत्न अनेक प्रतिगामी शक्तींकडून होताना दिसतो हे आपल्या जीवनातील अनेक प्रसंगातील अनुभवातून स्पष्ट केले. डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या ‘दि.प्रॉब्लेम ऑफ रुपीज’ या पुस्तकाच्या आधारे आपल्या देशात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली.
आपल्या देशाची एकता व अखंडता कायम ठेवण्याचे काम बाबासाहेबांनी लिहिलेल्या भारतीय संविधानात केले असून ओबीसी आरक्षण व महिलांना हक्क प्राप्त करुन देणारे हिंदू कोड बिल सरकारने मंजुर न केल्याने बाबासाहेबांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती अनिल जाधव यांनी दिली. याच कार्यक्रमात वेंगुर्ला तालुक्यातील आंबेडकरी चळवळीत एकनिष्ठ असणाऱ्या 16 कार्यकर्त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक आयु. सुनिल जाधव यांनी केले. सूत्रसंचलन राकेश वराडकर यांनी केले तर आभार विराज मठकर यांनी मानले.
जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या भीमस्तुती पठण स्पर्धेत लहान गटातून प्रथम- पर्णवी जाधव, द्वितीय- अर्णव वराडकर, तृतीय- सानिया कासकर तर मोठ्या गटातून प्रथम- चाहत शुक्ला, द्वितीय- प्रशील जाधव, तृतीय- कृतिका मठकर, उत्तेजनार्थ- सानवी मठकर यांनी क्रमांक पटकाविले. विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
