
आपण सर्वसामान्य लोकं एका गोड भ्रमात जगत आहोत. केंद्र आणि राज्यातून कोट्यवधी रुपयांचा निधी येत असल्यामुळे आपल्या गावांचा “विकास” होत आहे, असं आपल्याला भासवलं जातंय. पण जरा डोळे उघडून बघा! हा विकास नाही, तर ‘सौंदर्यीकरणा’च्या नावाखाली राजकीय नेते, ढिम्म प्रशासन आणि त्यांचे लाडके ‘झोळीवाहक’ कंत्राटदार यांच्या अभद्र युतीने रचलेला एक पद्धतशीर पर्यावरणीय गुन्हा आहे!
सत्ताधारी आणि त्यांचे ठेकेदार जेव्हा सिमेंटचे कंक्रीटचे व्ह्यूइंग गॅलरी (Viewing Gallery) बांधून स्वतःची पाठ थपटून घेतात, तेव्हा सिंधुदुर्गाचे शतकानुशतके जुने जलवैभव आणि पाणी साठवण्याचे पूर्वजांचे पारंपरिक ज्ञान गुदमरून मारताना दिसत आहे.
पाट तलाव आणि वालावल तलाव ही याची जिवंत आणि तितकीच विदारक उदाहरणे आहेत. माउली देवी आणि नारायण देवाच्या साक्षीने पवित्र मानले गेलेले हे तलाव आज केवळ कचरा टाकण्याचे आणि भ्रष्टाचार लपवण्याचे उकिरडे बनले आहेत.
दाहक वास्तव : आकडेवारी काय सांगते?
आमच्या ग्रामपंचायतींनी ‘ग्रामस्वराज्या’चे पवित्र आदर्श गुंडाळून ठेवले असून, त्या कंत्राटदारांच्या नफेखोरीत भागीदार बनल्या आहेत. एस.आर.एम. कॉलेज (SRM College) च्या तरुण विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी नुकत्याच राबवलेल्या स्वच्छता मोहिमेत या तलावांमधून हाताने काढलेल्या कचऱ्याची ही भयानक आकडेवारी बघा –
पाट तलाव (Pat Lake) :
* प्लास्टिक : ९.४३ किलो
* ग्लासच्या बाटल्या : ४५.६७ किलो
* मेटलचे डबे (Tins) : १५ किलो
* काच (Glass) : १३० किलो
एकूण : सुमारे २०० किलो मानवी निष्काळजीपणा!
वालावल तलाव ः सर्वात भयानक वास्तव
* प्लास्टिक आणि बाटल्या : १६५ किलो
* काच : ९.२७ किलो
* वापरलेले डायपर्स (DIAPERS) : चक्क ७० किलो!
जरा शांत पणे विचार करा… ७० किलो मानवी विष्ठेने भरलेला, घातक वैद्यकीय कचरा (Biological Medical Waste) वालावलच्या पाणी स्त्रोतामध्ये सडत पडला होता!
आणि म्हणूनच आज वालावल तलावाचा पृष्ठभाग ‘कमळांच्या’ (Nelumbo nucifera) पानांनी पूर्णपणे झाकून गेला आहे. हे कोणतेही सौंदर्य नसून, तलाव मरत असल्याचा तो एक जैविक इशारा आहे (Eutrophication). मानवी मैला आणि कचऱ्यातील नायट्रेट्स आणि फॉस्फेट्समुळे पाण्यात इतकी विषारी पोषणद्रव्ये वाढली आहेत की, या कमळांनी सूर्यप्रकाश अडवला आहे. परिणामी, पाण्याखालील वनस्पतींचा प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेअभावी मृत्यू होत आहे आणि विरघळलेला ऑक्सिजन संपल्यामुळे तिथले जलचर प्राणी गुदमरून मरत आहेत.
६ कोटी रुपये खर्चून विकत घेतलेली आपत्ती!
पाट तलावामध्ये एक निरुपयोगी सिमेंटची व्ह्यूइंग गॅलरी बांधण्यासाठी तब्बल ६ कोटी रुपये फुंकण्यात आले. पण याची पर्यावरणाने चुकवलेली किंमत माहिती आहे का?
तलावाच्या मुख्य पूर रेषेतील (Flood Line) १०,००० चौरस फूट क्षेत्र बेकायदेशीरपणे माती टाकून बुजवण्यात आले.
शतकानुशतके जुन्या हेरीटेज वृक्षांसह ५० वेगवेगळ्या प्रजातींच्या वनस्पतींची निर्घृण कत्तल करण्यात आली.
पक्ष्यांच्या १३० प्रजाती त्यांच्या हक्काच्या अधिवासातून कायमच्या बेघर झाल्या.
३८,०८८ क्युबिक फूट नैसर्गिक पाणी साठवण क्षमता कायमची नष्ट झाली! पूर रेषा (LFL & HFL) बुजवल्यामुळे आणि सागरी महामार्गावरून येणारे रासायनिक पाणी अडवणारा ७५ मीटरचा नैसर्गिक बफर झोन नष्ट केल्यामुळे तलावाची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपली आहे. जेव्हा सह्याद्रीत मुसळधार पाऊस पडेल, तेव्हा हे पाणी कुठे जाणार? ते थेट तुमच्या शेतात आणि घरात घुसणार!
आणि ढोंगीपणाचा कळस म्हणजे, ज्या ग्रामपंचायतीचे सदस्य या विघातक विकासावर छाती थोपटून फिरतात, त्यांच्या स्वतःच्या ग्रामपंचायत इमारतीची सेप्टिक टँक (Sewage Tank) पाट तलावाच्या पूर रेषेत बेकायदेशीरपणे बांधलेली आहे!
खरा विकास आणि दूरदृष्टी काय असते
जर प्रशासनाकडे आणि स्थानिक नेत्यांकडे थोडी जरी दूरदृष्टी असती, तर हा कोट्यवधींचा निधी तलाव नष्ट करण्यासाठी नाही, तर त्यांचे संवर्धन करण्यासाठी वापरता आला असता.
१. धामापूर मॉडेलसारखे विसर्जन कुंड –
धामापूर तलावाच्या धर्तीवर दोन्ही तलावांच्या बाजूला वेगळे विसर्जन कुंड बांधायला हवे होते. गणेशमूर्तींची शाडूची माती पाण्यात विरघळत नाही, ती तळाशी बसून तलावाचे सच्छिद्रत्व संपवून टाकते, ज्यामुळे पाण्याचे झरे बंद होतात. वेगळे कुंड असते तर तलावही वाचले असते आणि मूर्तिकारांना ती शाडूची माती दरवर्षी पुनर्वापरासाठी (Recycle) मोफत मिळाली असती.
२. झिरो लिक्विड डिस्चार्ज (ZLD) व कचरा व्यवस्थापन –
गावातील सांडपाण्यासाठी ZLD यंत्रणा राबवायला हवी होती. परुळे ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन पाट आणि वालावलने स्वतःचे घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवून कचरा वेंगुर्ल्याच्या ‘स्वच्छ भारत वेस्ट पार्क’मध्ये पाठवायला हवा होता.
३. जागतिक पर्यावरण पर्यटन :
या समृद्ध जैवविविधतेच्या जोरावर उत्तम होमस्टे, नेचर वॉक आणि नेचर इंटरप्रिटेशन सेंटर्स सुरू करून स्थानिक तरुणांना रोजगार देता आला असता. आपल्या गावांमध्ये युनायटेड नेशन्स (UN Tourism) चा “बेस्ट टूरिझम व्हिलेज” (सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव) हा जागतिक पुरस्कार जिंकण्याची ताकद आहे!
पण आमच्या नेत्यांना तुम्हाला जागतिक नकाशावर न्यायचेच नाहीये. तरुणांना स्वावलंबी बनवण्यापेक्षा, त्यांना काही हजार रुपयांचे तुकडे टाकून आणि तात्पुरती खोटी प्रतिष्ठा देऊन स्वतःचे गुलाम आणि ‘बाहुले’ बनवून ठेवण्यातच या राजकारण्यांचा फायदा आहे. (सर्वच राजकीय पक्षांच्या)
आपण आपल्या पूर्वजांचे अमूल्य जलवैभव सिमेंटच्या तुकड्यांसाठी विकून टाकले आहे आणि कंत्राटदारांना आपल्या मुलांचे भविष्य लिहू दिले आहे.
सिंधुदुर्गवासीयांनो, आता तरी जागे व्हा! त्याआधी की माउली देवी आणि नारायण देवाच्या मंदिरासमोर फक्त सिमेंटचे ढिगारे आणि प्लास्टिकचे सडलेले तलाव उरतील.
“देव्हारा सजला सोन्याचा, पण गाभारा रिकामा केला, पैशाच्या या बाजारात, आम्ही आमचाच निसर्ग विकला… पाण्यासाठी आसुसलेली पाखरे आज विचारतात आम्हाला, विकास तुमचा झाला नक्की, की आमचा काळ आला?”
– सचिन देसाई, स्यमंतक ,
९४०५६३२८४८
