महिलांच्या नेतृत्वगुणांना व ग्रामीण प्रशासनातील त्यांच्या मोलाच्या योगदानाला अभिव्यक्तीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग-तुळसतर्फे तलाठी व ग्रामसेवक महिलांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “ग्रामीण प्रशासनातील महिला शक्ती” या विषयावर घेण्यात आलेल्या या निबंध स्पर्धेत राज्यभरातील ३४ महिलांनी सहभाग घेतला. यात प्रथम-संगिता पाटील (पियाळी-कणकवली), द्वितीय-सायली सातोसे (अणसूर-वेंगुर्ला), तृतीय-अक्षता पाटील (वांझोळे-रत्नागिरी), उत्तेजनार्थ-वर्षा नाडकर्णी (आरोस-सावंतवाडी) आणि अर्चना लाड (जानवली-कणकवली) यांनी क्रमांक प्राप्त केले. स्पर्धेतील निबंधांचे परीक्षण डॉ.सचिन परूळकर आणि डॉ.गोविंद धुरी यांनी केले. स्पर्धेतील निबंधांमधून महिला तलाठी व ग्रामसेविकांनी ग्रामीण प्रशासनातील आपल्या जबाबदाऱ्या, जनतेशी असलेले नाते, शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविताना आलेले अनुभव, लोकाभिमुख प्रशासन, महिला नेतृत्व आणि ग्रामविकासातील आपले योगदान प्रभावी शब्दांत मांडले. तसेच ग्रामीण प्रशासनात महिला अधिकारी केवळ प्रशासकीय भूमिका निभावत नसून परिवर्तनाच्या प्रभावी शिल्पकार म्हणून कार्यरत असल्याचे या स्पर्धेतून अधोरेखित झाले आहे.
