दाभोली येथे कृषी, शैक्षणिक, आरोग्य व समाजोपयोेगी सेवेसाठी दाभोली येथील शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष गोखले यांनी आपली आई कै.पंचगंगा यशवंत गोखले यांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी सभागृह बांधून दिला आहे. या सभागृहाचा लोकार्पण सोहळा २ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी डॉ.दशरथ जाधव यांच्या हस्ते पार पडला.यावेळी सरपंच उदय गोवेकर, सदस्य पपल बांदवलकर, जि.प.सदस्य विजय नाईक, कृषी सहाय्यक जीवन परब, वायंगणीचे माजी सरपंच सुमन कामत, पोलिस पाटील जनार्दन पेडणेकर आदी उपस्थित होते. डॉ. दशरथ जाधव यांच्या हस्ते संतोष गोखले यांचा सत्कार करण्यात आला. दाभोली गावात शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संतोष गोखले काम करीत आहेत. गावातील नागरिक, विद्यार्थी यांच्यासाठी आरोग्य, शैक्षणिक, कृषीविषयक उपक्रम राबविण्यासाठी स्वखर्चाने सभागृह बांधून जनसेवेकरीता केलेले काम अभिमानास्पद असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. सूत्रसंचालन अण्णा जोशी यांनी तर आभार बबन पडवळ यांनी मानले.
