संगणक शिक्षकाचे एक वर्षाचे मानधन आगाऊ अदा 

ज्ञानदा विकास संस्थेच्यावतीने संगणक शिक्षकाचे सुमारे एका वर्षाचे मानधन आगाऊ देऊन विद्यार्थ्यांची असलेली संगणक शिक्षकाविना होणारी गैरसोय दूर केली आहे. संस्थेने केलेल्या या सहकार्याबद्दल शिक्षकांसह पालकांनीही संस्थेचे आभार मानले.
दाभोली शाळा क्र.१ या शाळेमध्ये संगणक यंत्रणा कार्यरत आहे. परंतु, संबंधित शिक्षकाच्या मानधनाअभावी संगणक यंत्रणा यापुढे सुरू रहाते की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान, शाळेचे मुख्याध्यापक शंकर सावंत यांनी ज्ञानदा विकास संस्थेचे अध्यक्ष संदिप पाटील यांच्याकडे शिक्षक मानधनाबाबत सहकार्य मिळावे अशी मागणी केली होती. शाळेची गरज आणि विद्यार्थ्यांना संगणक ज्ञानाची असलेली आवश्यकता आदींचा विचार करून ज्ञानदा विकास संस्थेचे अध्यक्ष संदिप पाटील यांनी तात्काळ संगणक शिक्षकाचे मानधन देताना सुमारे ३५ हजार रूपयांचा धनादेश मुख्याध्यापक शंकर सावंत यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावेळी संस्थेचे सदस्य देवेंद्र राऊळ, कमलेश करंगुटकर, राजाराम कांबळी आणि शाळेतील शिक्षक उपस्थित होते.  संस्थेने केलेल्या या सहकार्यामुळे शाळेला एक वर्ष संगणक शिक्षक उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळणार असून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Leave a Reply