रूग्णांना शहरी आरोग्यवर्धीनी केंद्राचा आधार

वेंगुर्ला शहरातील सर्व नागरिकांसह दुर्गम भागातील लोकांना तसेच कातकरी समाजाला मोफत चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शहरी आरोग्यवर्धीनी केंद्राला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या अडीच वर्षात सुमारे २२ हजार नागरिकांनी येथील आरोग्य सुविधेचा लाभ घेतला आहे.
समाजातील सर्वच लोकांना आरोग्या सुविधा मोफत मिळाव्यात यासाठी तालुकास्तरावर उपजिल्हा रूग्णालय तसेच गावपातळीवर आरोग्य केंद्र कार्यरत आहे. याच धर्तीवर शहरातील इतर नागरिकांसोबतच कातकरी आणि मच्छिमार समाज तसेच दुर्गम भागातील नागरिकांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी “शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र” महत्त्वाची कामगिरी बजावत आहे. जिल्हापरिषद मार्फत १५व्या वित्त आयोगातून १ मे २०२३ रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर या केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रात प्रत्येकी एक याप्रमाणे वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि आरोग्य सेवक हे आलेल्या रूग्णांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वैद्यकीय सेवा पुरवित आहेत. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचे काम नगरपरिषद करीत आहे.
या केंद्रामार्फत सर्दी, खोकला, ताप यांसह अन्य आजारांवर उपचार केले जात असून वेळप्रसंगी रूग्णाची प्रकृती चिंताजनक असल्यास अशा रूग्णांना उपजिल्हा रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले जात आहेत. या केंद्रात तीन बेड असून रूग्णांना दिवसा सलाईनद्वारे उपचारही करण्याची सोय उपलब्ध आहे. या केंद्रात दर गुरूवारी प्रसुतीपूर्व तपासणीही होते. तर दर शनिवारी योगा शिबिरही घेतले जाते. महालॅबमार्फत रक्ताच्या सर्व चाचण्या केल्या जातात. या केंद्रामार्फत दर महिन्याला शहरातील शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. याव्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेंगुर्ला शहरात काही रूग्ण हे दीर्घकालीन आजारग्रस्त आहेत. या केंद्राने अशा रूग्णांचा सर्वे करून त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहेत. अशाप्रकारचे २५ रूग्ण सध्या या केंद्राच्या देखरेखीखाली आहेत. या केंद्रामार्फत कुष्ठरोग आणि टीबीसारख्या आजारांवरही औषधोपचार केले जातात. तसेच आयुष्यमान, आभा आणि वयोवंदना कार्ड काढून देण्याची सोय या केंद्रात उपलब्ध आहे. केंद्रामार्फत मोफत देण्यात येणारा औषधसाठा मुबलक प्रमाणात असून ईसीजीची सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी येथील व्यवस्थापनाची आहे.

Leave a Reply