सिंधुदुर्गात शेती, बागायती आणि मासेमारी अजूनही मुख्य आधार आहेत. पण गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या बदललेल्या स्वभावामुळे हे दोन्ही क्षेत्र अस्थिर झाले आहेत. आंबा-काजू बागांमध्ये स्थानिकांनी मोठी गुंतवणूक केली होती. अनेक कुटुंबांना त्यातून स्थैर्य मिळाले होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. पावसाचे वेळापत्रक बिघडले. भातशेतीत नुकसान वाढले. आंबा आणि काजू बागांचा व्यवस्थापन खर्च प्रचंड वाढला. एकरभर बागेतून चांगले उत्पन्न मिळाले तरी मशागत, खते आणि कीटकनाशके यांचा खर्च अर्ध्याहून अधिक खाऊन टाकतो. वातावरण बदलाचा मारा झाला की पीक वाचवण्यासाठी आणखी खर्च करावा लागतो. शेवटी हातात काही उरत नाही. सुपारीला फळगळीचा फटका बसला. नारळाचे उत्पन्न घटले. जंगलच नष्ट झाल्यामुळे वन्य जीवांचा नैसर्गिक अधिवास मानवी वस्तीत आला आहे, त्यामुळे वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. बाग सांभाळण्याशिवाय पर्याय नाही. हे चक्र कसे सोडवायचे, याचे उत्तर कोणाकडेही नाही.
मासेमारीची अवस्थाही वेगळी नाही. पारंपरिक मच्छीमारांना एकेकाळी चांगला दर मिळायला लागला होता. पण गेल्या काही वर्षांत समुद्रातील वादळे वाढली. मासे मिळण्याचे दिवस कमी झाले. बाहेरून येणाऱ्या मोठ्या नौकांनी अवैध मार्गाने मासेमारी सुरू केली. पारंपरिक मच्छीमारांचा वाटा घटला. नव्या पिढीला यात भविष्य दिसत नाही. काही कुटुंबे पर्यटनाकडे वळली, पण पर्यटन ठराविक भागापुरतेच मर्यादित आहे. त्यातही मोठ्या गुंतवणुकदारांचा नफा जास्त आहे. स्थानिकांना मिळणारा हिस्सा तोकडाच राहतो.
सिंधुदुर्गात वरवर पाहिले तर बागायती आणि पर्यटन वाढत असल्याचा भास होतो. पण वास्तव वेगळे आहे. मोठे उद्योग नाहीत. तरुण पिढी १५-२० हजारांच्या नोकरीसाठी रोज गोव्यात जाते. मुक्काम परवडत नसल्याने ८० ते १०० किलोमीटरचा दुचाकी प्रवास रोज करावा लागतो. अपघातांची संख्या लक्षणीय झाली आहे. मानसिक ताणतणावातून तरुणांमध्ये व्यसनाधीनताही वाढत आहे. या अगतिकतेचा फायदा बाहेरून आलेल्या भांडवलदारांनी घेतला आहे. विशेषतः दिल्ली लॉबी सिंधुदुर्गात जमीन खरेदीसाठी सक्रिय आहे. दोडामार्ग, सावंतवाडी व लगतच्या तालुक्यांमध्ये सरसकट खरेदी व्यवहार सुरू आहेत. स्थानिक जनतेतून या व्यवहारांची चौकशी व्हावी अशी मागणी जोरदारपणे होत आहे. सेकंड होमच्या नावाखाली स्थानिक पर्यावरण आणि जलस्रोतांमध्ये मनमानी बदल केले जात आहेत. डोंगर कापले जात आहेत, पाण्याचे स्रोत बाधित होत आहेत. या अनिर्बंध हस्तक्षेपाला आवर घालणे आवश्यक आहे. अन्यथा स्थानिकांचे जीवनमान आणखी अस्थिर होईल.
वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुक्यातील प्रस्तावित मायनिंग प्रकल्पांना स्थानिक लोकांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी तात्पुरती माघार घेतली असली, तरी असे पर्यावरणाचा विनाश करणारे उद्योग या भागात येताच कामा नयेत. यासाठी जनतेलाच जागरूक राहावे लागणार आहे. एकदा असे प्रकल्प आले की मागे वळून बघता येणार नाही. माती, पाणी आणि समुद्र सगळेच बाधित होतील.
महामार्ग, घाट रस्ते आणि खाणी यासाठी डोंगर पोखरले जात आहेत. दरडप्रवण क्षेत्र वाढत आहे. समुद्रकिनाऱ्यावर प्रदूषणकारी प्रकल्प येत आहेत. या सगळ्यामुळे सिंधुदुर्गाचे मूळ स्वरूप बदलत चालले आहे. विकासाच्या नावाखाली होणारे हे बदल स्थानिकांच्या हिताचे आहेत का? धोरणकर्त्यांनी या प्रश्नाला कधी गांभीर्याने उत्तर दिले आहे का? स्थानिकांना विश्वासात घेऊन धोरण ठरवले जात आहे का? तरुण पिढीला स्थानिक अर्थव्यवस्थेतच शाश्वत रोजगार देण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. उलट, पर्यावरणीय आघात सुरूच आहेत. स्थानिक हितसंबंध दुय्यम ठरले आहेत.
कोकणची अर्थव्यवस्था आणि संस्कृती एकमेकांशी घट्ट बांधलेली आहे. शेती-बागायती आणि मासेमारीला धक्का बसला की कोकणपणही ढासळू लागते. सध्याची स्थिती एका हंगामापुरती मर्यादित नाही. ती अनेक दशके राहण्याची शक्यता आहे. म्हणूनच आता तातडीने कृती करणे गरजेचे आहे. गावचा विकास साधत असताना स्थानिकांच्या मताला विचारात घेऊन लोकप्रतिनिधींनी धोरण आखणे गरजेचे आहे.
स्थानिक बागायतदार आणि मच्छीमारांना वातावरण बदलाशी जुळवून घेण्यासाठी व्यावहारिक मदत मिळाली पाहिजे. पिकांच्या जोखमी कमी करणारी योजना आणली पाहिजे. पारंपरिक मासेमारीला संरक्षण मिळाले पाहिजे. अवैध मासेमारीला आळा घातला पाहिजे. जमीन खरेदीवर स्थानिक हितसंबंधांचे रक्षण करणारे नियम कडक केले पाहिजेत. सेकंड होमच्या नावाखाली होणाऱ्या पर्यावरणीय हस्तक्षेपाला आळा घातला पाहिजे. मायनिंगसारख्या विनाशकारी उद्योगांना येथे थारा मिळू नये. तरुण पिढीला स्थानिक कौशल्य आणि उद्योगांमध्ये संधी मिळाली पाहिजे. गोव्यात रोज प्रवास करण्याऐवजी गावातच सन्मानजनक रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. नवीन पर्यावरण पूरक उद्योगांचे स्वागत व्हायला हवे.
हे सगळे करत असताना एक गोष्ट विसरता कामा नये. कोकणी माणूस आणि त्याचे कोकणपण टिकून राहिले पाहिजे. बाहेरून आलेल्या भांडवलाच्या जोरावर विकास साधला जाऊ शकतो, पण त्यामुळे स्थानिक संस्कृती आणि लोकजीवन नष्ट होऊ नये. सिंधुदुर्ग हे फक्त पर्यटन आणि बागायतीचे ठिकाण नाही. हे एका विशिष्ट जीवनशैलीचे, एका विशिष्ट मातीचे प्रतीक आहे, ते जपले पाहिजे. दंगा मस्ती, हुल्लडबाजी ऐवजी इको टुरिझमला प्रोत्साहन असायला हवे, त्याकरिता स्थानिकांचा पुढाकार हवा आणि शासनाचे पाठबळ हवे. धोरणकर्त्यांनी आता या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला पाहिजे. स्थानिकांना विश्वासात घेऊन तरुण पिढीला नवी दिशा दिली पाहिजे. अन्यथा येत्या काही वर्षांत सिंधुदुर्गचे मूळ रूप बदलून जाईल. कोकणपण हरवेल. आणि एकदा हरवले की ते परत मिळवणे कठीण होईल.
