हे गणराया….

      हे गणराया, अलीकडे गणेशोत्सव केवळ उत्सव न राहता एक व्यावसायिक ‘गणेश फेस्टिव्हल’ बनला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागे लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला आणि आज वृत्तपत्रांमधून व बातम्यांमधून आदर्श गणेशोत्सव कसा साजरा व्हावा हे वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की, काही ठिकाणी काही बोलण्याचीही चोरी झाल्यासारखे वातावरण असते. कारण लगेचच “तुम्ही धर्मविरोधी बोलत आहात” असे म्हणत ट्रोलधाड अशा लोकांवर धावून जाते. बोलण्यामागचा हेतू व कळकळ न समजता राजकारण केले जाते. अनेक शहरांत सार्वजनिक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून उत्सव साजरा केला जातो.  आजूबाजूला राहणाऱ्या लोकवस्तीवर या सततच्या धागडधिंगाण्याचा विपरीत परिणाम होतो. बऱ्याच ठिकाणी प्रत्यक्षात भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशांवर उत्सव साजरे केले जातात आणि बक्कळ पैसा खर्च करणारा देणगीदार याद्वारे आपले पापक्षालन झाल्याचे समाधान मानून घेतो.
            हे गणराया, आजच्या काळातील दुष्ट शक्ती या समाजातच सभ्यपणाचा बुरखा घालून राहतात आणि त्यांना पाठीशी घालणारे समाजातलेच राजकारणी किंवा तथाकथित पुरोगामी असतात, जे आपल्या राजकीय फायद्यासाठी या दुष्कृत्यांचे समर्थन करतात. या आसुरी शक्तींचा विनाश व्हावा, हीच सर्वसामान्यांची आपल्या चरणी प्रार्थना आहे. ज्यांच्या अथक प्रयत्नांनंतर आपल्या सार्वजनिक उत्सवात आणि सर्वच सार्वजनिक ठिकाणी ध्वनीप्रदूषण प्रतिबंधक कायदा आला, अशा सुमैरा अब्दुलअली, डॉ.महेश बेडेकर, डॉ.कल्याणी मांडके, विवेक वेलणकर, शरद केळकर, ॲड. धनंजय मानेसहित असंख्य सामाजिक कार्यकर्ते आणि यावर्षी हा विषय महानगरपालिकेच्या बैठकीत आणि समाज माध्यमांवर सतत लावून धरणारे विद्यानंद बापट यांच्यासह अनेकांनी चालवलेल्या या प्रामाणिक आणि समाजहितकारक लढ्याचा पूर्ण विजय होवो, हीच प्रार्थना!
​               हे गणराया, आजच्या काळात खड्डेमुक्त रस्ते, सर्वांना परवडणारी दर्जेदार आरोग्य सेवा आणि तरुणांचे भवितव्य अंधारात ढकलणारी पेपर लीक न होणारी पारदर्शक परीक्षा पद्धती यांसारख्या मूलभूत मागण्यांसाठी आज राज्यभरात आंदोलने होत आहेत. लोकशाही व्यवस्थेत सरकारवरील टीका हा देशद्रोह नसून नागरिकांचा हक्क आहे, याची जाणीव ठेवून मूळ प्रश्न सोडवण्याची सद्बुद्धी लोकांनी निवडून
दिलेल्या प्रतिनिधींना येवो, हीच प्रार्थना!
​         हे गणराया, विशेषतः सिंधुदुर्ग आणि गोव्यात माटवी ही निसर्गातील विविधता एकत्रित आणून जुन्या काळापासून इथला घरगुती गणपती उत्सव पर्यावरणपूरक असल्याचे सिद्ध करते. रोजच्या जगण्यातील प्रथा-परंपरा आपल्याला निसर्गाची ओळख करून देतात, फक्त आपली नजर तशी हवी. आपले जीवन निसर्गाच्या कलाने जगल्यास निसर्ग सर्वांच्या गरजा भागवेल, पण अति लोभाच्या मागे लागल्यास निसर्गाचा रुद्रावतार पाहावा लागतो. या मानवाला सर्वनाश होण्याअगोदर जागा कर आणि सर्वांना सदबुद्धी दे, हे गणराया!

Leave a Reply