सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुके दुष्काळग्रस्त भाग म्हणून निवडले गेले आहेत. येथील नेमकी परिस्थिती काय आहे, याची पाहणी करून माहिती घेणे यासाठी जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत हा पाहणी दौरा सुरू केला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील होडवडा येथील नुकसानग्रस्त भात पिकाची पाहणी, पाण्याच्या पातळीमध्ये घट झालेल्या विहिरींची पाहणी आणि पाणी पातळी कमी झालेल्या बंधाऱ्याची पाहणी राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून पाहणी दौऱ्याची माहिती दिली.यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जि.प.शिक्षण आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सभापती शंकर घारे, भाजप तालुका अध्यक्ष पपू परब, वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, जि.प. सदस्य सुजाता पडवळ, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, सुचिता वजराटकर, होडावडा सरपंच रसिका केळुसकर, उपसरपंच राजबा सावंत, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, उपसरपंच वैभवी परब, पाल सरपंच कावेरी गावडे, तुळस सरपंच रश्मी परब, विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी, कृषी विस्तार अधिकारी कोरगावकर, सावंत, मंडळ अधिकारी प्रेरणा गिरप, नेत्रा सावंत, तसेच किशोर परब, नितीन चव्हाण, राहुल पै, तुषार साळगावकर, कमलेश गावडे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री नितेश राणे यांनी लोकांशी संवाद साधून गेल्यावर्षी आणि यावर्षी पावसाचा काय परिणाम झाला आहे याची माहिती घेतली. विहिरींची पाण्याची पातळी किती आहे, छोट्या बंधाऱ्यांमध्ये पाणी किती आहे याची प्रत्यक्ष पहाणीतून माहिती घेतली. यावर्षी दुष्काळसदृष्य परिस्थिती असल्याने लोकांमध्ये जागृती आणणे यासाठी आपला हा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मदत करणारच आहेत. पण मदत रोख स्वरूपात असेल किंवा अन्य स्वरूपात असेल हे सरकार ठरवणार.दुष्काळाचा सामना करण्यासाठी आतापासूनच पाणी वाचवण्याच्या कामाला सुरुवात व्हायला हवी यासाठी बंधाऱ्यांची कामे प्राधान्याने सुरू करा, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेला केले.
