सेवा संकल्प अभियान अंतर्गत ‘कचऱ्यातून कलाकृती’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वच्छता ही सेवा २०२६ व सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता स्वामी विवेकानंद सभागृह, वेंगुर्ला नगरपरिषद येथे “कचऱ्यातून कलाकृती” या  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत सुमारे ३५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी टाकाऊ व पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा कल्पकतेने वापर करून विविध आकर्षक कलाकृती, सजावटीच्या वस्तू तसेच सामाजिक व पर्यावरणपूरक संदेश देणारी विविध मॉडेल्स सादर केली.
स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी “कचऱ्याचा पुनर्वापर व पुनर्चक्रण”, कचरा वर्गीकरण आणि पर्यावरण संवर्धन याबाबत आपल्या कलाकृतींमधून प्रभावी संदेश दिला. टाकाऊ वस्तूंमधून उपयुक्त व आकर्षक वस्तू तयार करून कचरा ही केवळ विल्हेवाट लावण्याची बाब नसून त्याचा योग्य वापर केल्यास तो उपयुक्त संसाधन ठरू शकतो, हे विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेतून दाखवून दिले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर व पुनर्चक्रणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. तसेच विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, सर्जनशीलतेला आणि पर्यावरणपूरक विचारांना प्रोत्साहन मिळाले.

Leave a Reply