।। वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे ।।– संतश्रेष्ठ तुकाराम
वृक्षवल्ली फळांची वाट लावून हे सोयरे आता आमचे दुष्मन झाले आहेत.
कोकणी माणूस तसा आळशी असे पूर्वी मत होते. घाटावरील शेतकऱ्यांच्या
मानाने कमी श्रम करणारा. पाच-सहा गुंठे जमीन दहा जणांत वाटलेली. जमिनीचे क्षेत्र लहान व वरखाली त्यामुळे एकसंध शेती नाही. उदरनिर्वाहासाठी मुंबईतून येणाऱ्या पैशांची वाट पहाणारा. त्यामुळे तरूण पोरांनी मुंबईची वाट धरली.
पण आताच्या पिढीने नवीन शेतीवाटा शोधल्या. काहीजण शेतकी अभ्यासाचे पदवीधर झाले. शेती, बागायती संबंधित जे उद्योग करता येईल ते ते आता करीत आहेत, नवीन पीढी सतेज आहे. निरनिराळे शेती विषयक व्यवसाय ते करीत आहेत. त्यांत विविध फळपिके निर्मितीसाठी रोपे तयार करणे आदी उद्योग-व्यवसाय सुरू केले आहेत. केळी, चिकू, आंबा, नारळ, अननसे, पेरू व सिताफळे – रामफळे आदी बागायती उभ्या झाल्या आहेत. पण या आस्मानी शत्रंूचे काय? जमिनीवरचे रानडुक्कर, रानरेडे, हत्ती आदी बागायती उद्ध्वस्त करतच आहेत. त्यांत आता माकडांबरोबरच महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी शेकरू याची भर पडली आहे. या सर्वांना मारण्यावर बंदीही आहे आणि तो गुन्हा सुद्धा आहे.
माकडांच्या तर चार चार पिढ्या एकूण मिळून १२ ते १५ माकडे एका टोळीत असतात. वयोमानामुळे वृद्ध माकडे मेंदू विषयक आजारांने ग्रस्त आहेत. माणसे बघितली की, मोठ्याने ओरडणे एवढेच नाही तर मागील काळात स्त्रीयांवर हल्ला केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
तरूण माकडे इकडे तिकडे उड्या मारून झाडावरील लागलेली फळे झडवून टाकतात. लहान माकडे लहान फांद्यांवर जाऊन फळे खातात. नुसती फळे खाण्याची बाब नंतर आली. पण त्यापूर्वी आंब्याला आलेली पहिली पालवी, त्यानंतर आलेला मोहोर आणि मग तुरे आली तर फळेही खातात. औषध फवारणी, खते, पाणी फवारणी, तण काढून टाकण्यासाठी मेहनत करून, पैसे खर्च करून हातांत कधी कधी काहीच फळ मिळत नाही.
घाटावरचे शेतकरी कर्जापायी आत्महत्या करत आहेत. कोकणातील बागायतदारांवरही हे संकट येऊ घातले आहे. वरील कामी प्रचंड कर्ज व नफ्याच्याबाबतीत शून्य. हे असेच चालत राहिले तर कोकण भूमी उजाड आणि कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही.
वानरे माडावरील नारळ तोडून वरचेवर फोडून त्यांतले पाणी पिऊन खोबरे खाऊन नारळ खाली टाकतात. आता मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे हे प्राणी आता खालच्या गावांतील बागायतीमध्ये शिरला आहे.
“शेकरू” अत्यंत सुंदर प्राणी. महाराष्ट्राच्या या राष्ट्रीय प्राण्याला तुम्ही जोपासले पाहिजे, असा कायदा आहे. हा प्राणी धारदार व लांब नखे असलेला, माडावरच राहणारा प्राणी आहे. संपूर्ण नारळ सर्व बाजूंनी आपल्या धारदार नखाने पोखरून तो आंतील सर्व खातो व नारळ खाली फेकून देतो. माडाखाली नारळांचा खच पडलेला मिळतो. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्रातील सर्व बागायती याने ओस पडल्या आहेत.
या सर्व प्राण्यांना पकडून त्यांचे निबिर्जीकरण करावे, तरच कोकणी माणसाचे जीवन सुखी होईल. भाजीपाल, वांगी, भेंडे, मिरच्या छान येतात. पण वन्यप्राणी संपूर्ण बाग खुरडून टाकतात. बागायती करून फायदा नाही. मेहनत फुकट वर कर्जाचा भुर्दंड. माझ्या बागेत रामफळाची मोठी झाडे आहेत. अति उकृष्ट ५०० ग्रॅम वजनाचे रामफळ मिळते. ते बाजारात विकल्यास २०० ते ३०० रूपये मिळू शकतात. तेथे दहा ते बारा माकडांचा वावर असतो. परिणामी, पिकाची नासाडी होते आणि कधीतरी एकही नाही तर कधी कधी चार ते पाच फळे मिळतात. हे अस्मानी संकट मोठे आहे. आताच सावध व्हावे. नुकसान भरपाईची मागणी हेही त्याबरोबर आलेच.
– डॉ. रविंद्र भगत, रेडी
(मो.9421268072)
