आजच्या काळात हिंदू समाजाने संघटित होणे काळाची गरज : सत्यविजय नाईक

हिंदू समाजामध्ये एकात्मता, संघटन आणि धर्मजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाजाच्यावतीने २१ जून रोजी सायंकाळी तुळस येथील उत्सव मंगल कार्यालयात तुळस, पाल, अणसूर, पेंडूर, मातोंड, होडावडे व वजराट या गावांतील हिंदू बांधवांच्या संयुक्त पुढाकाराने भव्य सकल हिंदू संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कीर्तनकार सुबोध मराठे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर गणेश उर्फ राजू जोशी गुरूजी, अमित नाईक, नितीन लिंगोजी आदी उपस्थित होते. संमेलनाच्या प्रारंभी सभागृहाबाहेर तुळस येथील उद्योजक आनंद तांडेल यांनी सपत्नीक गो मातेचे पूजन केले.
आजच्या काळात हिंदू समाजाने संघटित होणे ही काळाची गरज आहे. आपली संस्कृती, परंपरा, भाषा, सण-उत्सव आणि धार्मिक मूल्ये जपण्याची जबाबदारी प्रत्येक हिंदूची आहे. हिंदू समाज संघटित असेल तर राष्ट्र अधिक सक्षम आणि सुरक्षित राहील. आपल्या संतांनी नेहमीच समाजाला एकतेचा संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून धर्म, संस्कृती आणि स्वाभिमानाचे रक्षण केले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणही समाज-
हितासाठी कार्यरत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक सत्यविजय नाईक यांनी केले.
हिंदू धर्माचे पालन आपल्या घरापासून केले पाहिजे. संतानी आपल्याला जी शिकवण दिली आहे, त्यानुसार आचरण करावे असे गणेश जोशी गुरूजी यांनी सांगितले. ज्येष्ठ कीर्तनकार सुबोध मराठे यांनी संस्कार विषयी तर अमित नाईक यांनी पंचपरिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर यांनी तर प्रास्ताविक नितीन लिंगोजी यांनी केले. या हिंदू संमेलनाच्या माध्यमातून आपण सर्वांनी हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संकल्प करूया असे आवाहन यावेळी आयोजकांनी केले.
या संमेलनाला वेंगुर्ला तालुका संघ चालक बाबुराव खवणेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, पं.स.सभापती शंकर घारे, जि.प. सदस्य सुजाता पडवळ, मच्छीमार नेते वसंत तांडेल, तुळस उपसरपंच सचिन नाईक, मातोंड सरपंच मयुरी वाडाचेपाटकर, पाल सरपंच कावेरी गावडे, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, वजराट सरपंच अनन्या पुराणिक, होडावडा उपसरपंच राजबा सावंत यांच्यासह या सर्व गावातील हिंदू बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवकालीन शस्त्रांची प्रात्यक्षिके बिलवाडी येथील युवक युवतींनी दाखवून संमेलनात उत्साह निर्माण केला.

Leave a Reply