बंदरावर वाढत असलेल्या गर्दीचा विचार करून अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा व पर्यटकांना अधिक चांगला आनंद लुटता यावा, यासाठी बंदरावर जाणाऱ्या मार्गावरील मांडवी रोडनजीक खाऊगल्ली निर्माण करण्याचा निर्णय वेंगुर्ले पालिकेने घेतला होता. या अनुषंगाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत प्राप्त अनुदानातून १२ गाळे उभारण्यासाठीच्या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले.उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, आरोग्य व स्वच्छता सभापती गौरी माईणकर, क्रीडा व सांस्कृतिक सभापती सचिन शेटये, महिला बालकल्याण समिती सभापती गौरी मराठे, उपसभापती रिया केरकर, सार्वजनिक बांधकाम सभापती प्रणय वायंगणकर, नगरसेवक संदेश निकम, प्रीतम सावंत, सदानंद गिरप, प्रशांत आपटे, नगरसेविका सुमन निकम, काजल कुबल, लीना म्हापणकर, समिधा रेकडर, ठेकेदार राजेंद्र पोळ, नगर अभियंता विशाल होडावडेकर आदी उपस्थित होते.
शासनाच्या योजनेतून सुंदर खाऊगल्ली विकसित करण्यात येणार आहे. यासाठी ५० लाखाचा निधी मंजूर झाला असून शासकीय नियम पाळून वैशिष्ट्यपूर्ण १२ गाळे येथे उभारण्यात येतील. या खाऊगल्लीत व्यवसाय करणाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भविष्यात बंदरावरील रहदारी कमी व्हावी व पर्यटकांना मुक्तपणे पर्यटनाचा आनंद लुटता यावा, यासाठी याच रोडवर वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. या रोडवरून बंदरावर जाण्यासाठी ५०० मीटर अंतर असल्याने पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक बसमधून पर्यटकांची ने-आण करण्याचा संकल्प आहे. यापुढील टप्प्यात याबाबत विचार होणार आहे. खाऊगल्लीमुळे पर्यटनाच्या अजून चांगल्या संध्या उपलब्ध होतील, असे गिरप म्हणाले.
