शिरोडा-वेळागर येथील बहुचर्चित ताज प्रकल्प सुरू होण्यासाठी लवकरच पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या १८५ खातेदारांना सुमारे ६० कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या प्रकल्पासंदर्भातील त्रिपक्षीय कराराला मान्यता मिळाल्याने प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर झाले असून प्रकल्पाला गती मिळाली असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली. आमदार केसरकर यांच्या निवासस्थानी ताज ग्रुपचे अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी आणि स्थानिक संघर्ष समितीच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली. बैठकीप्रसंगी तहसीलदार ओंकार ओतारी, प्रांताधिकारी, माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आदी उपस्थित होते.प्रकल्पाची पहिली जाहिरात येत्या काही दिवसांत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यापूर्वी काही खातेदारांनी स्वीकारली नसलेली नुकसान भरपाई आता नवीन दरानुसार देण्यात येणार आहे. मात्र, नवीन दराने भरपाई मिळविण्यासाठी पूर्वीची भरपाई स्वीकारणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे सर्व खातेदारांनी पूर्वीची नुकसान भरपाई स्वीकारावी, असे आवाहन केसरकर यांनी केले. एकूण १८५ खातेदारांना सुमारे ६०कोटी रुपयांची भरपाई तीन टप्प्यांत वितरित करण्यात येणार आहे. यासाठीची यादी प्रांताधिकारी आणि तहसीलदार प्रसिद्ध करणार असून जुन्या व नव्या दरानुसार स्वतंत्र यादी जाहीर केली जाईल, ज्या खातेदारांचे निधन झाले आहे, त्यांच्या वारसांची पडताळणी करून भरपाईचे वितरण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
ताज ग्रुपच्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पामध्ये स्थानिक भूमिधारक आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहत. नोकरभरती करताना स्थानिक कुटुंबीयांना प्राधान्य देण्याची तरतूद करण्यात आल्याचे आमदार केसरकर यांनी स्पष्ट केले.
प्रकल्प क्षेत्रातील दोन एकर जागा ग्रामपंचायतीकडे पर्यटन विकासासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. या जागेवर विविध पर्यटनविषयक प्रकल्प राबविले जाणार आहे. वादग्रस्त सर्व्हे क्रमांकांवर कोणतीही प्रक्रिया केली जाणार नाही. तसेच त्या जमिनींचा नुकसान भरपाई योजनेत समावेश नसल्याचेही त्यांनी सांगितले.
