बहुआयामी व्यक्तिमत्त्व – अतुल हुले

मूळ दाभोसावाडा येथे घर असलेल्या अतुल हुले यांचा जन्म त्यांच्या आजोळी मालवण येथे झाला. वडील कै. तुकाराम कृष्णाजी हुले हे महाराष्ट्राच्या शासनाच्या नोकरीत होते. वित्त विभागाचे उपसचिव या पदावरुन ते सेवानिवृत्त झाले आणि वेंगुर्ल्यात आपल्या घरीच स्थायिक झाले. ते वारकरी सांप्रदायाचे अनुयायी होते. ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक, उत्कृष्ट कीर्तनकार व प्रवचनकार म्हणून त्यांचा लौकिक होता. तर अतुल हुले यांच्या मातोश्री कै. कमल हुले या मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षिका होत्या. मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यावर त्या मालवणात आल्या आणि समाजकार्यात त्यांनी वाहून घेतले. त्या मालवणच्या नगरसेविका होत्या. अशा संस्कारी आणि समाजसेवेचा वारसा लाभलेल्या कुटुंबात अतुल हुले यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व साकारले. त्यांनी व्ही.जे.टी.आय.मधून स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. १९६५ साली ते मुंबई गृहनिर्माण मंडळात कनिष्ठ अभियंता या पदावर रुजू झाले. अगदी तरुण वयात त्यांनी गृहनिर्माण मंडळाच्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे नियोजन केले. वांद्रे येथील म्हाडाची मुख्य प्रशासकीय इमारत, गृहनिर्माण भवन ही त्यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाली. १९७० साली वांद्रे येथे म्हाडा इमारतीची उभारणी झाल्यावर त्याच्या उद्घाटनप्रसंगी इंदिरा गांधींकडून या बांधकामाची प्रशंसा झाली होती. म्हाडाच्या माध्यमातून अतुल हुले यांनी लाखो मराठी मध्यवर्गीयांना मुंबईत स्वतःचे हक्काचे घर मिळवून दिले होते. मंत्र्यांचे दबाव व आर्थिक आमिषाला बळी न पडता, म्हाडातील अनियमितता व भ्रष्टाचारावर कठोर कारवाई त्यांनी केली आणि त्या आधारे कोकणातीलही म्हाडा प्रकल्पही नियोजित वेळेनुसार निष्ठेने पूर्णत्वास नेला. कार्यक्षमता, विनम्र स्वभाव, अभ्यासपूर्ण लिखाण यामुळे त्यांनी अनेकांची मने जिकली. त्यांची नियुक्ती त्यानंतर नियोजन विभागात करण्यात आली होती. त्यामुळे अधिक व्यापक कामे करता आली.

      अतुल हुले उपजत चित्रकार होते. इंजिनिअर झाल्यावरही त्यांनी आपली आवड, छंद जोपासले. चित्रकलेचा व्यासंग जोपासताना मित्र, परिचित, आप्तेष्ट यांना स्वतः तयार केलेली शुभेच्छा पत्र दरवर्षी ते न चुकता पाठवत असत. त्यांच्या या उपक्रमाला मिळालेला प्रतिसादही त्यांनी जपून ठेवला होता. त्यांचा फार मोठा लोकसंफ होता. तो त्यांनी विविध कामांमधून वृद्धिगत केला होता. ‘किरात‘चे संपादक कै.श्रीधर मराठे यांचे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. विविध विकासकामांबाबत त्यांच्या चर्चाही व्हायच्या. रांगोळी सम्राट गुणवंत मांजरेकर यांच्या समवेत अनेक रंगावली प्रदर्शनात त्यांनी भाग घेतला होता. मैदानी खेळात खोखो, कबड्डीमध्येही ते प्रविण होते. शरिरसौष्ठव पटू म्हणूनही त्यांनी नाव कमविले होते. सांस्कृतिक उपक्रमांची त्यांन प्रथमपासूनच आवड होती. म्हाडा सांस्कृतिक व क्रिडा मंडळाची स्थापना त्यांनी केली. त्यावेळी म्हाडाच्या अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली होती. गृहनिर्माण मंडळाच्या संचालक मंडळावरही त्यांनी कर्मचारी प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले होते.  सिधुदुर्ग सांस्कृतिक केंद्रामार्फत पहिले मालवणी संमेलन त्यांनी यशस्वी केले होते. मुंबईतील पहिला-वहिला मालवणी जत्रौत्सवही त्यांनी यशस्वी केला. पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘मालवणी डेज‘ हा मालवणी खाऊगल्लीच्या महोत्सवामुळे सिधुदुर्गातील पर्यटन उपक्रमाला चालना मिळाली होती. दांडी-मालवण ग्रामोत्कर्षक समितीमार्फत दांडी आदर्श गाव म्हणूनही विकसित करण्यामागे हुले यांचे मार्गदर्शन होते. मच्छिमारांचा लढा यशस्वी होण्यासाठी, त्यांना न्याय्यहक्क मिळवून देण्यासाठी ते कायमच त्यांच्या पाठीशी खंबिरपणे असत.

      मुंबईतील जुन्या चाळींची दुरुस्ती व पुर्नबांधणी या कामात लाखो गोरगरीब भाडेकरुंच्या वतीने उभे राहून एक अधिकारी म्हणून नव्हे तर जनतेचा मित्र म्हणून काम केले. कुर्ला येथे ‘शिवसृष्टी‘ या ७५ इमारतींच्या सहकारी तत्वावरील वसाहतींचे शिल्पकार म्हणून आजही अतुल हुले यांचे नाव घेतले जाते. वेंगुर्ला येथील समर्थसृष्टी मधील लाभधारकांची संघटना स्थापन झाली त्यामागे अतुल हुले यांचेच मार्गदर्शन व प्रेरणा होती.

      डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक समितीच्या माध्यमातून भारत-चीन संबंध वृद्धींगत केल्याबद्दल चीनच्या राष्ट्राध्यक्षांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला होता. तसेच कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या सागरेश्वर येथे होणा-या स्मारकाबद्दल, वेंगुर्ला येथील पर्यटक बोट सेवा, रेडी बंदरातील बुडालेल्या बार्जचा प्रश्न निकाली काढण्याबाबत त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. वेंगुर्ला येथील नारायण तलाव प्रश्नी त्यांनी गेली १५ वर्षे कायदेशीर लढा दिला. वेंगुर्ला नागरी कृती समितीतर्फे नागरी संस्थातील भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांनी कायमच आवाज उठविला. नारायण तलाव बांधकामातील अनियमितता आणि भ्रष्टाचाराबाबत वेळोवेळी वृत्तपत्रे, किरातमधूही अभ्यासपूर्ण लेखमाला लिहिल्या. तसेच प्रसंगी न्यायालयीन लढाही सुरु ठेवला.

      त्यांच्या जाण्याने एक कुशल मार्गदर्शक, चित्रकार, सामाजिक तळमळ असलेला कार्यकर्ता, पर्यटनाभिमूख आस्था असलेला, नवनविन संकल्पनांना मूर्त रुप देणा-या हरहुन्नरी व्यक्तीची उणिव वेळोवेळी भासणार आहे. किरात परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली!

This Post Has One Comment

  1. 🙏 🙏 अतुल हूले त्यांच्या जाण्याने एक कुशल मार्गदर्शक, चित्रकार, सामाजिक तळमळ असलेला कार्यकर्ता, पर्यटनाभिमूख आस्था असलेला, नवनविन संकल्पनांना मूर्त रुप देणा-या हरहुन्नरी व्यक्तीची उणिव वेळोवेळी भासणार आहे. किरात परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली!🙏 🙏 💐💐💐

Leave a Reply

Close Menu