वर्षापूर्वी सारे जग बेसावध असताना कोरोना महामारीचा प्रवेश झाला. बघता बघता त्याने अनेक देश व्यापले. आपल्या भारतातही मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. जगभरात लाखो मृत्यू झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात आलेल्या महामारीनंतर आता कोरोनाया नावाने ही महामारी आली आहे. या महामारीचा दणका संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला बसला. भारताची अर्थव्यवस्था कोलमडली. आरोग्यसेवा, शिक्षण व्यवस्था यांनाही मोठा फटका बसला. स्वातंत्र्यानंतर या व्यवस्था बळकट करण्याकडे आपण गांभिर्याने पाहिले नाही, हे ढळढळीत सत्य समोर आले. वर्षभर लॉकडाऊन करण्यात आले. त्याचा फटका सामान्य माणसापासून मोठ्या उद्योगपतीपर्यंत बसला. त्यातून हळूहळू सावरत असताना जनजीवन पूर्वपदावर येत असताना आता नव्याने कोरोनाचा उदय झाला आहे.

      गेल्या वर्षभरात आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी झालेल्या प्रयत्नांतून आता देशातील आरोग्य व्यवस्था ब-यापैकी रुळावर आली आहे. वर्षापूर्वी कोरोना आल्यानंतर रुग्णांवर उपचार करणारी सारी यंत्रणा अत्यंत तोकडी पडली. उपचाराविना अनेकांचे मृत्यू झाले. आता कोरोना नियंत्रणासाठी शास्त्रज्ञांनी लसीचे संशोधन केले आहे. देशभरात लसीकरण मोहिम जोरात सुरु आहे. लसीकरणाचे काही टप्पे ठरलेले आहेत. त्यानुसार शासकीय रुग्णालयातून मोफत आणि खासगी रूग्णालयात २५० रुपये शुल्क आकारून लस मिळणार आहे. आरोग्य व्यवस्थेतील कर्मचारी तसेच महामारीच्या काळात काम केलेल्या योद्ध्यांना प्राधान्याने लसीकरणाचा लाभ दिला जात आहे. या टप्प्यावर काम सुरु असताना आता नव्याने कोरोना आल्याने वैद्यकीय यंत्रणा थोड्या प्रमाणात सक्षम झाली असली तरी आता जबाबदारी नागरिकांची आहे. बेजबाबदारपणा या साथीला निमंत्रण देणारा ठरतो आहे. गर्दी आणि त्यांतील संसर्ग टाळणे, सामाजिक अंतर ठेवणे, तोंडावर कायम मास्क लावणे आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीवरच आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवता येते. या सोप्या गोष्टी असल्यातरी आपण त्याकडे गांभिर्याने पाहत नाही, हीच खरी अडचण आहे. लसीकरणातून काही टप्प्यावर नियंत्रण येऊ शकते. परंतु, शासनाने दिलेले नियम आणि साथीपासून बचाव करण्यासाठी दिलेली नियमावली याचे काटेकोरपणे पालन केले तर आपण या साथीवर नियंत्रण आणू शकू. एका माणसाच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांना संसर्ग होऊन शकतो आणि म्हणूनच प्रत्येकाने या काळात गांभिर्याने आरोग्याकडे पाहण्याची गरज आहे.

           शिक्षणाची तर वाट लागली आहे. ऑनलाईन पद्धतीचा खेळखंडोबा झाला आहे. शाळा, शिक्षण, परीक्षा या गोष्टी सुरळीत करण्याचे नियोजन असतानाच आता पुन्हा प्रादुर्भाव वाढल्याने आगामी काळात शिक्षणाचे काय? आणि नव्या पिढीचे भवितव्य काय? हे प्रश्न सतावणारे आहेत. मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत पालक द्विधा मनःस्थितीत आहेत. आरोग्य कि शिक्षण यातून आरोग्यालाच प्राधान्य मिळणार, हे खरे असले तरी भविष्याचा विचार करुनच शासनाला आणि त्याबरोबर प्रत्येक नागरिकाला पाऊल उचलावे लागणार आहे.

  • सुभाष घुमे, ०२३२७-२२६१५०

Leave a Reply

Close Menu