लॉटरी

‘‘महाराज आपला दिल फार मोठा आहे. आप बहोत पुण्यवान हो, आपका आज भाग्य खुलनेवाला है! आप आज जरुर लॉटरी निकालो! धर्म करो‘‘ असे म्हणत तो कपाळावर भलामोठा टीळा लावून एक दाढीवाला माझ्या समोरच उभा राहिला. क्षणभर मी दचकलोच. अचानक काहीच सुचेना आणि माझी सुटका करण्यासाठी सोपा मार्ग निवडला तो म्हणजे चक्क त्याच्या हातात दहा रुपये सुपुर्द करुन आजूबाजूला कोणी ओळखीचे नाही ना हे पाहून बाजूला होऊन सटकलो आणि नीळकंठसोसायटीमधील केमिस्टमधून गोळ्या घेऊन बाहेर पडताना गेटवरच परत तो दुस-या कोणासमोर उभा असलेला दिसला. परत तोच डायलॉग कानावर पडला. ‘‘..महाराज ……..

    माझ्याकडे वेळेचे काहीही बंधन नसल्याने थोडा वेळ थांबून मी पाहिले तो ५-६जण त्याच्या फे-यात सापडले होते. काहीजणांनी त्याला हाकलून दिले. शिव्या दिल्या. पण दोघेच माझ्यासारखे दिलवाले, पुण्यवान निघाले, त्यामुळे मी खुश.!

     चालता चालता मी मलाच विचारले, ‘खरचं मी का दिले त्याला पैसे? खरचं मी घाबरलो म्हणून की त्याने मला पुण्यवान, दिलवाला म्हटले म्हणून?‘ असा विचार करत असताना जोराचे हसू आले. परंतु, ते माझ्या लक्षात नाही आले. पण आजूबाजूला चालणा-या लोकांच्या ते लक्षात आलेले कळाले. कारण, माझ्या अचानक जोरात हसण्याने लोकांनी मला पुढे चालायला रस्ता मोकळा करुन दिला तेव्हा. पण माझ्या मनात पुन्हा एकदा विचार आला खरचं काढायचे का लॉटरीचे तिकीट?

     लागेल का मला लॉटरी? बापरे!मन भलतेच भरकटलेले पाहून मनाला बजावून इथच थांब असे सांगितले. आणि कधीतरी आम्हीसुद्धा लॉटरीचे भक्त होतोच याची आठवण झाली. त्यावेळचे चाळीतले ते दिवस खूप मजेशीर होते. आमचा काही मित्रांचा ग्रुप जमला होता. काहीही करायचं तर ग्रुपमध्ये करायचो. पिकनिक, पार्टी, चाळीतील साफसफाई, सहकार्य असो दाजी, पद्या, नाना हे आमचे म्होरके होते. त्यांच्या सुपिक डोक्यात आयडियाची कल्पना यायची खोटी; ती अंमलात आणण्यासाठी अथक प्रयत्न करायचो. तसे आम्ही वयापेक्षा खूपच प्रगल्भ असायचो. शिवाजीपार्कमधील होणा-या सगळ्या नेत्यांच्या सभांना हजेरी लावायचो. पण सगळ्याच नेत्यांचे विचार आमच्या मनात प्रभाव पाडायचे, कोण बरोबर, कोण चूक या विषयावर सुध्दा हाणामारी व्हायची. गणिततज्ज्ञ आमचा दाजी तर लोकमान्यांच्या विचाराने खूप प्रभावित असायचा. त्यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रभावाने त्याच्या डोक्यात एक विचार आला आपण पण सण साजरा करायचा तो म्हणजे ‘‘लॉटरीत्सोव‘‘ करायचा.

     दिवाळीत बंपर लॉटरी तिकिटांची बंपर खरेदी करण्याची कल्पना दाजीने एकमेव मताने पास करून टाकली आणि आमची टीम कामाला लागली. मग लॉटरीची तिकिटे कोणी कशी आणि कुठल्या एरियातून काढायची याची तुंबळ चर्चा सुरु झाली. शेवटी अख्ख्या मुंबईत फिरुन तिकिटे काढायची असे एक मताने (दाजीच्या) ठरले. तिकिटे खरेदी साठी सर्वांनी एकत्र मिळून जायचे ठरले आणि मग कधी बसने कधी ट्रेनने, शेवटी टॅक्सी करून संपूर्ण मुंबईत फिरून खरेदी झाली. सगळ्या देवस्थानच्या म्हणजे मुंबादेवी, महालक्ष्मी, शीतळादेवी, प्रभादेवी, जरिमरी, माऊंटमेरी, हाजीअली दर्गा, पारशी अग्यारी अशा अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे पालथी घालून तिथल्या लॉटरी विक्रेत्यांकडून सुमारे शंभर तिकिटे खरेदी केली. प्रत्येकाकडे सगळ्यांची झेरॉक्स काढून ठेवली. झालेल्या खर्चाची नोंदणी झाली. खरं तर एक गोष्ट उशिरा लक्षात आली ती म्हणजे लॉटरीच्या तिकिटापेक्षा प्रवासखर्चच जास्त झाला होता.

     प्रत्येकाने आपली झेरॉक्स देवाच्या फोटोमागे लपवून ठेवली व कधी नव्हे ते सकाळ, संध्याकाळ न चुकता देवाच्या फोटोला हात जोडून नमस्कार करताना पाहून घरातल्या मोठ्यांना नवल वाटायला लागले; हल्ली पोरं फारच भक्तीमय झालीत याचे!

     शेवटी तो सोनियाचा दिवस आलाच. सकाळी पेपरवाला यायच्या अगोदर आमची गँग लवकर उठून तयार. शेवटी आमच्या शंभर तिकिटातील एका तिकिटाने आमचे भाग्य बदलून टाकले. चक्क त्या तिकिटाला एक शंभर रुपयांची लॉटरी आम्हाला लागली आणि तिथेच आमच्या लॉटरीत्सोवाची इतिश्री  झाली.

     नंतर म्हाडा, सिडकोच्या घरांच्या लॉटरीने सुध्दा दगाच दिला. चाळीतल्या दीपोत्सवातील लॉटरीमध्ये आम्ही करंटे निघालो. त्यामुळे लॉटरी आमच्यासाठी लाभदायी नव्हती याची खूणगाठ बांधून आम्ही कष्टकरी या विभागाचे आजीव सदस्य झालो. त्यामुळे अचानक धनलाभ आमच्या भाग्यात नाही हे ठरवून आम्ही रस्त्यावर पडलेल्या पैशाच्या पाकिटाकडे पण ढुंकूनही पाहिले नाही. एकदा तर माझ्या हातातील पडलेली माझीच नोट मी उचलण्याआधीच दुस-याने ती माझीच आहे असे छातीठोकपणे सांगून ती उचलून स्वतःच्या खिशात टाकलेले मी निमुटपणे सहन केले आहे.

     पण नाही म्हणायला एकदा आमचे भाग्य फळफळले आठवतंय. ऑफिसला जायच्या अगोदर लोकसत्ता चाळताना सहजच आजचे राशिभविष्य या सदरावर नजर टाकली व चक्क आज माझ्या राशीत ‘‘अचानक धनलाभ‘‘ हे वाचून हसूच आलं. विचार करुन पाहिले पण माझा दुरचा कुठलाही नातेवाईक आफ्रिकेच्या जंगलात सोन्याच्या खाणीत साधा कामगार पण नव्हता. त्यामुळे सरळ ऑफिसचा रस्ता धरला.

     संध्याकाळी घरी निघायच्या वेळी एक नातेवाईक हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्याने घरी जायला उशीर होणार आहे हे लक्षात येऊन घरी सौ. ला फोन करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये असलेल्या पब्लिक टेलिफोन बॉक्समध्ये नाणी टाकली पण तिसरे नाणे अर्धवट अडकून पडले त्यामुळे मी त्या बॉक्सवर जोरात थाप मारली आणि मी दचकलोच धडाधड आवाज करत त्या बॉक्समधून चक्क २० नाणी माझ्या हातात जमा झाली आणि शेवटी चक्क मला आज धनलाभ झालाच!!                       प्रकाश कब्रे. चित्रकार                                                                                           ९६५७४५६६४७

Leave a Reply

Close Menu