तुळस श्रीदेव जैतीर उत्सव – 8 जून रोजी कवळास उत्सवाने होणार सांगता

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावचा प्रसिद्ध जैतीर उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत 30 जून रोजी मोठ्या उत्साहात झाला. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे हा उत्सव साध्या पद्घतीने साजरा झाला. कोरोना निर्बंध उठल्यानंतर यावर्षी या उत्सवात भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.

      मंदिरासमोर मांडावर येणाऱ्या अवसारी देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. दुपारी 2.30 च्या सुमारास देवघरातून देव मांडावर आल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली. त्यामुळे वातावरण भक्तीमय बनले होते.

      श्रीदेव जैतीर दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान असून या देवस्थानमध्ये वर्षातून एकदा भरणाऱ्याला उत्सवाला मुंबई, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, बेळगाव, गोवा तसेच जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले होते. आपली गाऱ्हाणी देवासमोर मांडली तर ती पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.

      श्रीदेव जैतिर मंदिरामध्ये सकाळी धार्मिक विधी व पूजापाठ झाला. तर दुपारपासून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. उत्सवासाठी एस.टी. मंडळाकडून जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. उत्सवाच्या ठिकाणी खेळणी, हॉटेल्ससह शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांचा मोठा बाजार भरला होता. यामध्ये नांगर, जू, गुटा, दावी, दोऱ्या, प्लास्टिक कापड तसेच घोंगड्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. सलग अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता 8 जून रोजी कवळासाने होणार आहे. जैतिरोत्सवामुळे तुळस गाव भक्तीमय बनला असून गावात चैतन्यमय वातावरण बनले आहे.

Leave a Reply

Close Menu