उद्योजकांनी मांडला समाज प्रबोधनाचा नवा आयाम

      समाजातील तृतीयपंथी व्यक्तीलाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि समाजाने त्याला आपल्यापासून वेगळे न करता समजून घेत अशा शोषित घटकांच्या मागे उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन रिया आळवेकर यांनी केले. कुडाळ औद्योगिक वसाहतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने  घेतलेल्या या पुढाकाराबद्दल विशेष धन्यवादही दिले. याकार्यक्रमात तृतीयपंथी प्राथमिक शिक्षिका श्रीमती रिया आळवेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने पार पडलेल्या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत होते.

      कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या उद्योजकांचे कुडाळ एमआयडीसी असोसिएशनचे दिवंगत संस्थापक कै. विश्राम शंकर परब, कै. मधुकर बळवंत सरनाईक, कै. नारायण उर्फ भाई प्रभू, कै. त्रिंबक देसाई, कै. मुकुंद तळवेलकर, कै.रमेश चव्हाण यांचे कुटुंबीय सोहळ्यास उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संस्थेच्या प्रांगणात स्मृतीवृक्ष लागवड करण्यात आली. या सर्व कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष शशिकांत चव्हाण, अमित वळंजु, आनंद बांदिवडेकर यांचाही सत्कार करण्यात आला.

      असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी असोसिएशनने उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन, उद्योजकांनी संघटीत होण्याची गरज व्यक्त करुन त्यासाठी सर्व उद्योजकांनी पुढे यावे असे आवाहन केले.

      सूत्रसंचालन हरिश्‍चंद्र वेंगुर्लेकर, सल्लागार तथा माजी क्षेत्र अधिकारी एम.आय.डी.सी. यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. कुणाल वरसकर यांनी केले.

Leave a Reply

Close Menu