जलधि मधील जलद “संगणक” …एक “जलपरी”

         ईश्‍वराने निसर्ग निर्माण केला त्याच बरोबर मानवाची पण निर्मिती केली. असे असून देखील, ईश्‍वर निर्मित या दोन अपत्यां मध्ये ठळक फरक जाणवतो तो म्हणजे ‘दातृत्वाचा!’ कुणी निसर्गप्रेमीने लिहिल्याचे वाचनात आले, सूर्य आहे म्हणून जग आहे. सूर्य सर्व सृष्टीसाठी प्रकाश देतो. फुले आपल्याला सुगंध देतात. दुसऱ्यांसाठी जगण्यातील ही गंमत आपल्याला कळली  पाहिजे.  निसर्गाने नेहमीच मानवाला सढळ हाताने भरभरून उर्जा दान दिले आहे परंतु मानवाचा, या दानशूरपणामध्ये हात आखडता होतो.

      या सर्वसाधारण धारणेला अपवाद, म्हणून आजही अशा काही संस्था आहेत ज्या परोपकार व दातृत्व या भावना आपल्या अंतःकरणात रुजवून, जोपासून त्यांचा साक्षात्कार समाजाला घडवित आहेत. अशाच संस्थांपैकी एका संस्थेचे नाव आवर्जून घ्यावेसे वाटते ती म्हणजे “World Records India” व या संस्थेचे दोन खंदे शिलेदार आहेत, ते म्हणजे श्री. संजय व सौ. सुषमा नार्वेकर!

      आजवर या दांपत्याने समाजसेवेचा वसा घेऊन, समाजातील, विविध क्षेत्रातील, वेगवेगळ्या स्तरांवरील अगणित व्यक्तिमत्वे ज्यांनी काही वैशिष्टय पूर्ण कामगिरी केली आहे, ज्यांनी प्रस्थापित उच्चांकांची चौकट तोडून स्वतःचा उत्तुंग यशाचा आलेख रेखाटला आहे, परंतु, ज्या व्यक्ति समाजाच्या प्रकाश झोतात येऊ शकल्या नाहीत, किंबहुना प्रसिध्दीस आल्या नाहीत त्यांना- आत्मियतेने व स्वतःच्या कौशल्यपूर्ण नजरेने हुडकून, त्यांना योग्य व्यासपीठ तथा योग्य मार्गदर्शन आणि नैतिक पाठबळ प्रदान केले व समाजासमोर आणले आहे!

      फेब्रुवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात, मदर तेरेसा हायस्कूल, वेेंगुर्ला 14 वर्षीय विद्यार्थीनाने अभूतपूर्व असा सागरी विक्रम केला! तिचे नाव ‘स्नेहा रंजन नार्वेकर!’

      असं काय केलंय या स्नेहा नावाच्या जल परीने ते जाणून घेऊया!

      पोहोण्याच्या सहा swimming strokes म्हणजे : * Freestyle, * Front Crawl, * Backstroke, * Breaststroke, * Butterfly stroke आणि * Sidestroke. या सहा जलतरण पद्धती मधून स्नेहाने ‘बॅक-स्ट्रोक’ सारखी कठीण पध्दत वापरून वेंगुर्ले येथील समुद्रात पोहण्याची क्रिडा तर केलीच परंतु या वरही जाऊन तिने केवळ वीस मिनिटात 12 वेगवेगळ्या प्रकारचे Rubic Cube सहज यशस्वीरित्या सोडविले!

      स्नेहाचा हा अभूतपूर्व विक्रम वाचून Rubic Cube चे निर्माते  Erno Cube पण चक्रावून जातील, कारण या Rubic Cube चे कोडे सोडविण्याचे प्रयत्न सर्व सामान्यपणे जमिनी वरील माणसांमध्ये दिसून येतो! परंतु हा एकदम युनिक विक्रम जाणून ते असतील तिथून स्नेहाला साष्टांग दंडवत घालतील! यातील विनोदाचा भाग सोडला तर स्नेहाचा हा विक्रम – ‘वेळ, क्यूबचा अभ्यास आणि तिची लिलया पोहण्याची क्षमता’ पाहून, तिच्या सक्षम आणि सुदृढ शारिरीक आणि बौध्दिक पातळीची साक्ष देतो!

      स्नेहाचा हा विक्रम World Records India चे प्रतिनिधी श्री. व सौ. नार्वेकर यांनी जगासमोर आणून एक दातृत्वाचा दाखला दिला आहे! स्नेहाचा हा अलौकिक विक्रम राष्ट्रीय स्तरावर नावाजला गेल्यामुळे वेंगुर्ले तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा आणि पर्यायाने महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे!

      या विक्रमानंतर स्नेहा तिचे मनोगत व्यक्त मनोगत व्यक्त करताना म्हणते की, “अरबी समुद्रात बॅक स्विमिंग करत हे क्यूब सोडवले आहेत. लहानपणापासून स्विमिंगचा सराव असल्यामुळे समुद्रात पोहताना भिती वाटली नाही. भविष्यात इंडियन नेव्हीमध्ये जायची ईच्छा असून त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.“

      स्नेहाच्या या पोहण्याच्या पॅशनची वाटचाल जाणून घेणे आवश्‍यक आहे.

      स्नेहाने निवडलेला मार्ग सोपा नक्कीच नव्हता तर तिची आतापर्यंतची वाटचाल तेवढीच खडतर होती! एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्नेहाला तिच्या आठव्या वर्षी एकदा वेंगुर्ले येथील जलतरण तलावाचे विहंगम दर्शन घडले व स्नेहाचे या तलावाशी स्नेह-बंध जुळले गेले! या छोट्याशा घटनेने तिने एक स्वप्न पाहिले व त्या स्वप्नपूर्तीसाठी स्वतःला या पोहण्याच्या प्रशिक्षणामध्ये झोकून दिले!

: स्नेहाच्या जल प्रवासामधील महत्त्वाचे दीप स्तंभ :

      * सर्वात प्रथम ज्यांचा नामोल्लेख करणे आवश्‍यक आहे ते स्नेहाचे पालक श्री. रंजन अनिल नार्वेकर आणि सौ मानसी रंजन नार्वेकर! आपल्या मुलीच्या सर्वांगीण विकासासाठी आई-वडिलांनी त्यांचे नैतिक, आर्थिक पाठबळ दिले. ते स्नेहाच्या शैक्षणिक-क्रिडा इ. वाटचालीत दीपस्तंभासारखे दृढ उभे राहीले!

      * प्रत्येक मुला-मुलींच्या जीवन प्रवासामधील त्यांचा द्वितीय गुरु असतो तो/ती म्हणजे त्यांना योग्य मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी निष्ठावान शिक्षक तथा प्रशिक्षक! स्नेहाला तिच्या जलतरण प्रशिक्षणात लाभलेले प्रशिक्षक श्री. दिपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्या जलतरण प्रवासाची गंगा जोमाने वाहू लागली! या प्रवासात स्नेहाने पोहण्याच्या क्रिडेमधील स्वतःची तीव्र इच्छा, दृढ आत्मविश्‍वास, गुरुंचे सुयोग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अथक मेहनत या चारही घटकांची शिदोरी तिला तिच्या स्वप्नामधील यशाच्या मंदिराकडे पोहोचण्यासाठी एक एका पायरीवर उत्तम साथ देत आहे!

      स्नेहाने, तन्मयतेने केलेल्या परिश्रमामुळे तिने जलतरण स्पर्धांमध्ये विविध स्तरांवर यश मिळविले. 2014 मध्ये सावंतवाडी नगर परिषदेने आयोजित केलेल्या ‘नगराध्यक्ष चषक‘ जलतरण स्पर्धेत सहभागी होऊन स्नेहाने तिच्या स्पर्धेची नांदी केली, परंतु या स्पर्धेत तिला यश मिळाले नाही! असे म्हणतात की, ‘अपयश ही यशाची पहीली पायरी असते.‘ या उक्तीला कोळून पिऊन, स्नेहाने या अपयशामुळे न खचता दुप्पट जोमाने पुढील कारकिर्द सुरु केली व नंतर मात्र तिच्या यशाचा वारु सुसाट चौफेर उधळू लागला!

      यानंतर स्नेहाने शालेय, जिल्हास्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरीय   जलतरण स्पर्धेत सहभागी होऊन 2014 – सावंतवाडी, 2015 – ओरोस, 2016 – वेंगुर्ले या ठिकाणी आयोजित केलेल्या जलतरण स्पर्धेत यशाचे निशाण रोवले.

      शासनामार्फत ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय 14 वर्षे वयोगटातील जलतरण स्पर्धा- अनुक्रमे 200 आणि 400 मीटर   जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक मिळविले.

      या यशामुळे सातारा येथील भरणाऱ्या स्पर्धेसाठी तिची निवड झाली. त्यामध्ये सुद्धा 200 व 400 मीटर जलतरण स्पर्धेत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय श्रेणी प्राप्त केली. नंतर नागपूर येथील जलतरण स्पर्धेत नववी श्रेणी संपादन केली. या यशाच्या ऐवजावर कर्नाटक-शिवमोगा येथील तुंगभद्रा नदी मधील होणाऱ्या स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणीमधील 05 कि. मी. जलतरण स्पर्धा अति वेगवान गतीने म्हणजे केवळ 1 तास 12 मी. एवढ्या कमी वेळात हे अंतर कापून महाराष्ट्रा मधील दुसरी वेगवान जलतरणपटू होण्याचा विक्रम आपल्या नावावर शिक्कामोर्तब केला! विशेष म्हणजे सदर स्पर्धेत- कोलकता, प. बंगाल, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश इ. राज्यातून 12 वर्षे खालील गटात तब्बल 300 जलतरणपटू सहभागी झाले होते.

      2018 मध्ये निवती-सिंधुदुर्ग येथील सागरी स्पर्धेत 1 कि. मी स्पर्धेत सातवा क्रमांक मिळविला.

      2019 मध्ये देवबाग-मालवण येथे Swimming Fed.of India द्वारे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील सागरी जलतरण स्पर्धेत केवळ 37 सेकंदात बाजी मारून नववा क्रमांक प्राप्त केला. 2019 मध्ये All India Stamina Sports – Goa आयोजित- फोंडा- गोवा राज्यस्तरिय Free Style स्पर्धेत द्वितीय श्रेणी प्राप्त केली. 2019 मध्ये Swimming fed.of India द्वारा आयोजित गोवा- करंजलेम बीचवर झालेल्या स्पर्धेत, 5 कि.मी. अवघ्या 45 मिनीटामध्ये कापून तिसरी श्रेणी + कांस्य पदकाची कमाई.

      2020 मध्ये गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे Swimming Association of Maharashtra आयोजित स्पर्धेत 14 वर्षा खालील वयोगटातील जलतरणपटू मधून पाचवी श्रेणी संपादन केली. वेंगुर्ले नगराध्यक्ष चषक आणि सावंतवाडी येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत प्रथम श्रेणी संपादन. 2020 मध्ये विजयदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत अवघ्या 13.57 सेकंदात 2 कि.मी हे अंतर लीलया कापले व तिसऱ्या श्रेणी सहीत कांस्य पदकाची कमाई केली. सातारा जिल्ह्यात Breast Stroke या जलतरण पध्दतीमध्ये पोहण्याच्या स्पर्धेत, सहभागी व यशस्वी झाली. गोवा- कोलवा बिचवर झालेल्या वयाच्या दहाव्या वर्षी U 14 वयोगटात राष्ट्रीय सागरी स्पर्धेत सहभागी होऊन 1 कि.मी. अंतर कापून आठवा क्रमांक प्राप्त केला.

      स्नेहाने तिच्या या जलतरण क्षेत्रातील यशासोबतच तिने तिच्या शैक्षणिक परिघावर सुद्धा लक्षणीय कामगिरी बजावली आहे!

      फेबुवारी 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे, द्वारा आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग सफलता संपादन करून उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती संपादन केली! इयत्ता पाचवीमध्ये असताना 2019 मध्येच ‘गणित प्राविण्य परीक्षे’ मध्ये उल्लेखनीय प्राविण्य मिळवून तालुक्यात प्रथम श्रेणी प्राप्त केली!

      ‘गुरुकुल संस्था‘ जळगांव येथे आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र Talent Search परीक्षा’ व ‘राष्ट्रीय Brain Developmen’ परीक्षेमध्ये- शिष्यवृत्ती व पदकाची मानकरी ठरली!

      2022 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग सफलता मिळवून आठवी मध्ये पुनःश्‍च महाराष्ट्र शासनाची मानाची शिष्यवृत्ती प्राप्त केली!

      स्नेहाच्या छोट्या वयामधील अद्भूत कामगिरी पाहून World Records India च्या समाज-सेवाव्रती ताई सौ. सुषमा नार्वेकर यांनी म्हटले की, ‘स्नेहाचा विश्‍वविक्रम अतुलनीय आहे. असा पराक्रम करणारी ती भारतातील किशोरवयीन गटातील पहिलीच मुलगी आहे!

      लाटा खूप सकारात्मक दृष्टीकोन शिकवतात. लाटा  केवळ उंच उडतात आणि फुटतात म्हणून नाही, तर त्या परत परत उंच उडण्याचा प्रयत्न सोडत नाहीत.

                आपल्या समोरील विविध आपत्ती म्हणजे ‘खडक‘ आणि आपण स्वतः म्हणजे ‘पाण्याचा प्रवाह‘ या दोहोमध्ये सतत संघर्ष चालू असतो- पण सरते शेवटी ‘पाण्याचा प्रवाह’ जिंकतो – कारण तो केवळ शक्तीने नाही तर दृढ निश्‍चय आणि सकारात्मक बळाने, सातत्यपूर्ण सर्वंकष प्रयत्न करतो!

– आनंद ग. मयेकर, ठाणे मो. 9930243943

Leave a Reply

Close Menu