निमित्त महिला दिनाचे…

     देशात गेली ८० वर्षे जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्रोत्तर अमृत महोत्सवाच्या कालावधीचे अवलोकन करता असे निदर्शनास येते की, कायद्याने जरी स्रियांना त्यांचे अधिकार प्राप्त झाले असले तरी त्याची प्रामाणिकपणे किती टक्के अंमलबजावणी केली जाते हा वादातीत मुद्दा आहे. २१व्या शतकात भारताची डिजिटल इंडिया व खेड्यातील भारत अशी विभागणी झाली. डिजिटल इंडियातील स्रिया जरी सुशिक्षित, स्वतःच्या विश्वासाहर्तेवर सर्वांगीण विकासाची पदे पादाक्रांत करणा­या, स्वतःचे स्थान बळकट करणा­या किवा साहित्य, सांस्कृतीक, राजकीय, क्षेत्रात आपला अमूल्य ठसा उमटवणा-­या असल्या तरी सुद्धा दुर्दैवाने अजूनही काही स्रिया पुरुषी अहंकाराची शिकार झाल्याचे दिसून येतात. काही पुरुषी असंवेदनशीलतेची बळी जाताना दिसतात. तसे जर नसते तर उजेडात आलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोणला इट्स माय चॉईसहा स्रियांवर होणा­या अन्याया विरोधात काढावा लागणारा व्हिडीओ, छत्तीसगढमध्ये सुरक्षा सैनिकांकडून आदिवासी स्रियांवर केलेले अत्याचार, त्याविरुद्ध आवाज उठविणा­या बेला भाटिया यांच्या घरावर मोर्चा आणून त्यांचे घर पेटवून देण्याची दिलेली धमकी, बिलकीस बानूने स्त्री अत्याचारा विरोधात मांडलेली परखड भूमिका आज दिसल्याच नसत्या. अशा कितीतरी आर्त किकाळ्यांचे आवाज अजुनही दबलेलेच आहेत.

      अशा अमानवी दुर्दैवी घटना समाजातील काही अविवेकी असंवेदनशील पुरुषी मानसिकतेमुळे घडून येताना दिसतात. त्यात केवळ अशिक्षित पुरुषी वृत्तीचाच सहभाग नसतो तर सभ्यतेच्या पांढ­या बुरख्याआड लपलेल्या असंवेदनशील मानसिकतेचा सहभाग सुद्धा लक्षणीय असतो.

        देशात केवळ महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या समुदायाकडून व्यासपिठावर भाषणबाजी करून महिलांचे मूलभूत प्रश्न सुटत नसतात. जेष्ठ कवी रमेश सावंत यांच्या कवितेच्या ओळी अधिक बोलक्या आहेत. ते म्हणतात

जरी तीला देवीचं रूप देऊन तीची देव्हा­यात पूजा केली जाते,

तीच तव्यावर भाकरी भाजतांना आपले हात पोळून घेते

तिच्या मनातील उद्वेगाचे निखारे पेटत असताना

कधी ती सावित्री तर कधी मदर तेरेसा तर कधी इंदिरा बनते

पण अन्यायाची परिसिमा गाठताना नराधमांच्या मुसक्या आवळत

आपल्याच आत्मभानाच्या शोधत फिरते….

      आजच्या काळात अशा स्रियांची खरी गरज आहे तरच समाजातील वैश्विक विषवल्ली मुळापासून नष्ट होईल. नाहीतर केवळ तिचे एक दिवस गाणे गात उरलेले ३६४ दिवस तिच्या आर्त किकाळ्याच कानात घुमत रहातील.

-संजय तांबे, फोडाघाट. मो-९४२०२६१८८८

Leave a Reply

Close Menu