जिल्हा शिक्षणामध्ये अग्रेसर ठेऊ!

शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्यावतीने १७ जुलै रोजी स्वामिनी मंगल कार्यालय येथे तालुक्यातील सर्व शाळेतील दहावी व बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच मुख्याध्यापकांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी  शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. मुश्ताक शेख, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी सामंत, रोटरीचे अस्टिटंट गर्व्हनर संजय पुनाळेकर, जिल्हा समन्वय सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनिल डुबळे, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, तालुका संघटक बाळा दळवी, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकरशहरप्रमुख उमेश येरम, युवासेना शहर प्रमुख संतोष परब आदी उपस्थित होते.

        गेली ९ वर्षे दहावी बारावी निकाल राज्यात सर्वात अव्वल सिधुदुर्गचा आहे आणि हे श्रेय शिक्षक व मुख्याध्यापकांचे आहे. हे सातत्य भविष्यातही टिकवून ठेऊ. ज्या समस्या आहेत त्या मंत्रीमहोदयांच्या सहकार्याने सोडविल्या जातील. शिक्षणात हा जिल्हा नेहमी अग्रेसर ठेऊ अशी ग्वाही महेश धोत्रे यांनी दिली. आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी स्पर्धापरीक्षांकडे जात नसल्याने अधिकारी होण्याची संख्या आपल्या जिल्ह्यातून कमी असल्याची खंत डॉ. मुश्ताक शेख यांनी व्यक्त करीत शाळेतून मुलांकडून स्पर्धापरीक्षांची तयारी करून घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करा आणि ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करा असे आवाहन केले. करिअरचे मार्ग खुप आहेत, ते निवडण्याची क्षमता तुमच्यात पाहिजे. पालकांनीही मुलांच्या आवडीनुसार क्षेत्र उपलब्ध करून द्यावे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी संघर्ष, संयम आणि सातत्य या तीन गोष्टी लक्षात ठेवा असे आवाहन डॉ. अश्विनी माईणकर-सामंत यांनी केले.

     लोकांच्या प्रश्नांमध्ये तातडीने लक्ष घालणारा नेता कोण असेल तर ते दीपकभाई. प्रत्येक विद्यार्थ्याला सुविधा मिळायला हव्यात यासाठी दीपकभाईंनी नियोजन केले आहे. त्यामुळे राज्यातील शाळांना चांगले दिवस येणार असल्याचे संजय पुनाळेकर यांनी सांगितले.   

     दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी दीपकभाई मंत्रिमंडळात निर्णय घेत आहेत. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा पुरेपुर फायदा घ्या. स्पर्धापरीक्षांमध्ये सहभागी व्हा. शिक्षणाबरोबरच सामाजिक मुल्ये जोपासा असे प्रतिपादन अशोक दळवी यांनी केले. राज्यात अनेक मंत्री, सामाजिक कार्यकर्ते आहेत. परंतु, गेले २५ वर्षे दीपक केसरकर यांना आमदार, मंत्री म्हणून जी जबाबदारी दिली ती उत्कृष्टपणे पार पाडली. केसरकर यांनी गेल्या दीड वर्षात महत्त्वाचे निर्णय राज्याच्या हितासाठी घेतले आहेत. ३० हजार शिक्षकांची भरती होणार असल्याचे सचिन वालावलकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.

      सूत्रसंचालन प्रा.वैभव खानोलकर यांनी तर आभार तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu