जीए शताब्दी कथा अभिवाचन : सुरस सादरीकरण

ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित यांच्या निलायम या संस्थेमार्फत व त्यांच्या संकल्पनेतून प्रसिद्ध कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या शताब्दी संस्मरण कार्यक्रमा अंतर्गत अभिवाचन जागर सुरू आहे. त्यानुसार जुलै ते डिसेंबर दरम्यान प्रत्येक महिन्याला 18 अभिवाचकांपैकी तीन अभिवाचक त्यांच्या पारवा, हिरवे रावे, पिंगळावेळ, सांजशकुन, रमलखुणा, रक्तचंदन, काजळमाया, निळासावळा, डोहकाळिमा या 9 कथासंग्रहातील प्रत्येकी दोन अशा तीन कथांचे अभिवाचन करणार आहेत. 10 जुलै रोजी जीएंच्या जन्मदिनी या उपक्रमाची सुरुवात झाली असून येत्या 11 डिसेंबर रोजी जीएंच्या पुण्यतिथीला सांगता होणार आहे. याअंतर्गत एका महिन्यात तीन कार्यक्रम होणार आहेत. कणकवली येथे निलायम तर्फे (11 ऑगस्ट, 10 सप्टे., 11 ऑक्टो., 11 नोव्हेें., 11 डिसेें.), कुडाळ येथे बाबा वर्दम थिएटर तर्फे (12 ऑगस्ट, 11 सप्टे., 14 ऑक्टो., 18 नोव्हेें., 17 डिसेें.) आणि तळेरे येथे संवाद परिवारातर्फे (13 ऑगस्ट, 9 सप्टे., 15 ऑक्टो., 12 नोव्हेें., 10 डिसेें.)कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. निलायम दी ब्ल्यू बॉक्स येथे अभिवाचन सुरू असताना शिरगाव येथील ज्येष्ठ रंगकर्मी आणि चित्रकार डॉ. राजेंद्र चव्हाण कथा ऐकत असताना या कथांमधली भावपूर्ण रेखाटलेली शब्दचित्र स्क्रीनवर प्रदर्शित करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक कथेचा हा वेगळा दृक्श्राव्य माध्यमातून अनुभव घेऊ शकणार आहेत.

      जुलै महिन्यात तीन ठिकाणी झालेल्या या अभिवाचन जागर मध्ये वामन पंडित (सांजशकुन- दीपस्तंभ), वर्षा वैद्य-सामंत (पिंगळावेळ- लक्ष्मी), डॉ. गुरुराज कुलकर्णी (काजळमाया-पुनरपी) अंजली मुतालिक (हिरवे रावे- बाधा), सीमा मराठे (हिरवे रावे- माकडाचे काय, माणसाचे काय?) यांनी उत्कृष्ट अभिवाचन करत रसिकांना खिळवून ठेवले.

      या कथांमध्ये- दीपस्तंभ- प्रत्येकाच्या आयुष्यात दोन वाटा येतात तेव्हा कुठल्या वाटेने जायचे हे ज्याच्या-त्याच्यावर अवलंबून असते. त्या दोन्ही वाटांवर खरेतर सारखेच टक्केटोणपे असतात. पण आपली दृष्टी किती सकारात्मक विचार करते यावर सर्व अवलंबून असते असे सांगणारी, लक्ष्मी- गरिबीचे वर्णन, मानवी नातेसंबंधांची गुंतागुंत, त्यातून होणारी घुसमट याचे यथार्थ चित्र, पुनरपी-जन्म आणि मृत्यू यातील अंतर, बाधा- अज्ञानातून निर्माण होणारे भिषण वास्तव, तर माकडाचे काय, माणसाचे काय? – एकाकी वृद्ध माणसाच्या मनातील भावविश्‍व आहे. एकूणच माणासाच्या वाट्याला येणारे सुखदुःख, राग, लोभ, यश-अपयश यामध्ये गुंतत गेलेले मानवी जीवन आपल्या लेखनशैलीतून जी.ए. सजगपणे मांडतात. त्यामुळेच त्या कथा वाचकाला आपलेसे करतात. असे असले तरी जीए हे कुठेतरी गुढ वलयांकीत, निराशावादी लेखक म्हणून त्यांच्यावर त्यांच्या कथा न वाचताच केवळ ऐकीव माहितीवर शिक्का मारला जातो. म्हणून जीए शताब्दी संस्मरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने जीए वाचले जातील, त्यांच्या दर्जेदार व वास्तववादी कथा पुन्हा एकदा चर्चिल्या जातील या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे वामन पंडित यांनी कणकवली येथील कार्यक्रमात सांगितले. त्यांच्या रमलखुणा या कथासंग्रहातील प्रवासी या कथेत जीए लिहीतात की, प्रवासी बैराग्याला विचारतो ‘कथा नवी आहे की जुनी? त्याला काही अर्थ आहे का?’ तेव्हा बैरागी म्हणतो ‘कथा सांगणाऱ्याइतकंच ती कथा ऐकणाऱ्यावरही अवलंबून असतं.’ आणि हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य सांगता येईल. कुडाळ येथील कार्यक्रमाचे उद्घाटन बाबा वर्दम थिएटर्सचे ज्येष्ठ सदस्य अरविंद शिरसाट तर संस्थापक चंदू शिरसाट यांच्या हस्ते बाबा वर्दम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. तळेरे येथील कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार तसेच प्रसिद्ध चित्रकार उदय दुधवडकर यांनी जी.ए. कुलकर्णी यांची चित्राकृती रेखाटून त्यांना मानवंदना दिली.

      या उपक्रमाची संकल्पना वामन पंडित (9422054744) यांची असून अधिक माहितीसाठी संपर्क यांच्याशी करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Close Menu