वेंगुर्ल्यातील दरड भागातील रहिवाशांचे स्थलांतर

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस-पलतड येथील त्या धोकादायक दरडीच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. त्यामुळे तेथे आता धोका नाही. मात्र सुरक्षिततेच्यादृष्टीने त्या दरडीच्या बाजूला असलेल्या चार घरातील ११ ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी राहण्याच्या व काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, रात्रीच्या वेळी हे ग्रामस्थ बाजूच्या नातेवाईकांकडे झोपण्यासाठी जात आहेत तर म्हापण येथे ही दरड कोसळली असून तेथील धोकादायक दोन घरातील सहा जणांना सुरक्षित स्थळी हलविले आहे, अशी माहिती वेंगुर्ल तहसिलदार ओंकार ओतारी यांनी दिली.

      सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर वाढत असून वादळी वारे ही वाहत आहेत. वेंगुर्ला तहसील कार्यालयातील आपत्ती विभाग सक्रिय असून तहसीलदार व कर्मचारी सर्वत्र लक्ष ठेवून आहेत. काही वर्षांपूर्वी तुळस पलतड येथे एक दरड कोसळून घरांना धोका निर्माण झाला होता. तो धोका लक्षात घेऊन शासनाने संबंधित दरडीच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधली आहे. दरम्यान इर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग प्रशासन आणखिणच सक्रिय झाले असून जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी सर्व तालुक्यातील तहसीलदार यांना आपापल्या तालुक्यातील धोकादायक दरडींच्या ठिकाणी पाहणी करून योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांनी तुळस-पलतड येथील संबंधित धोकादायक ठिकाणी कर्मचा-यसमवेत भेट दिली. तेथील नागरिकांशी सुरक्षेबाबत चर्चा करून संभाव्य धोका लक्षात घेऊन चारही कुटुंबांनी सुरक्षितस्थळी राहावे अशा सूचना दिल्या. ग्रामस्थांनीही त्या सूचनांचे पालन करून सुरक्षित स्थळी राहण्यास सुरुवात केली आहे.

      म्हापण येथे पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोरील भागात असलेल्या दोन घरांवर बाजूची दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये मोठी हानी झाली नाही. याबाबत माहिती मिळताच तहसीलदार ओंकार ओतारी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे हेही उपस्थित होते. दरम्यान दोन्ही घरातील सहा ग्रामस्थांना सुरक्षिततेच्यादृष्टीने योग्य जागी हलविण्यात आले आहे.

Leave a Reply

Close Menu