यांत्रिकीकरणाद्वारे भात लावणी प्रात्यक्षिके सुरु

सिधुदुर्ग जिल्ह्याच्या एकूण आठ तालुक्यांमध्ये यांत्रिकीकरणा संबंधीच्या मनुष्यबळ विकासाचा सुसूत्रताबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातर्फे दोडामार्ग, सावंतवाडी व वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये भात पिकाची यांत्रिकीकरणासंबंधी विविध शेतकर्‍यांच्या शेतावर एकूण दहा प्रात्यक्षिक प्लॉट तयार केले आहे. या प्लॉटमध्ये मॅट नर्सरीचे काम पूर्ण झाले असून सध्या यांत्रिकीकरणाद्वारे पुर्नलागवडीचे काम चालू झाले आहे.

      रोजगारासाठी कोकणात गावागावांमधून शहरांमध्ये मजूरांचे स्थलांतर झाल्यामुळे शेती कामासाठी मजूरांचा तुटवडा जाणवत आहे. परंतु, यांत्रिकीकरणाद्वारे या मजूरांच्या समस्येवर मात करता येणे शक्य आहे. कृषीमधील यांत्रिकीकरणासंबंधी तांत्रिक मनुष्यबळ विकसित करणे ही काळाची गरज आहे. याचाच एक भाग म्हणून डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठ, दापोली यांनी शास्त्रीय पद्धतीने माध्यमातून तांत्रिक मनुष्यबळ विकसित करण्याबाबतचा प्रयत्न सिधुरत्न समृद्धी योजना, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात राबविण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये गावातील शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, तरुण, बचतगट इत्यादीला विविध पिकांमधील यांत्रिकीकरणाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून भविष्यामध्ये या प्रशिक्षणार्थींनी भाडे तत्त्वावर भात पिकाची लावणी, पिक संरक्षण फवारणी, अंतरमशागतीची कामे, कापणी, मळणी, वारवणी, आवेष्ठन, ऊस पिकाकरीता जमिनीची मशागत, भर देणे, तण नियंत्रण तसेच आंबा बागेच्या पुनरुज्जीवनामध्ये ट्रॅक्टर चलीत यंत्राच्या सहाय्याने छाटणी, फवारणी, काढणी, बांबू पिकाचे काढणी पश्चात तंत्रज्ञान ज्यामध्ये शोभिवंत वस्तू निर्मिती, अगरबत्ती निर्मिती इत्यादी कामे अधिक प्रभाविपणे आणि विहित वेळेत पूर्ण करणे तसेच कोरोना महामारीच्या काळामध्ये शहरमधून गावाकडे स्थलांतरीत झालेल्या मनुष्यबळाला गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.

 

 

Leave a Reply

Close Menu